गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. मंगला नारळीकर (८०) यांचे आज निधन झाले. त्या खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. गेले अनेक दिवस डॉ. मंगला कर्करोगाशी झगडत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील अंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्रात अंत्यदर्शन झाल्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. मंगला नारळीकर यांच्या विषयी
मंगला नारळीकर या पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे होत्या. यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1962 साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या 1964साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले. 1965 मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.
SL/KA/SL
17 July 2023