मतदान जागृतीसाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांशी सीईओंचा संवाद

नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे, या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्वीप समितीच्या सह अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली या बैठकीमध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
प्रत्येक शाळेत निवडणूक साक्षरता कक्ष (Election Literacy Club) स्थापन करण्यात यावा, या क्लबच्या माध्यमातून निवडणुकीविषयी जनजागृती करण्यात यावी, या कक्षाचे सर्व कामकाज करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी आणि सर्व कामकाज हे विद्यार्थ्यांकडून करण्यात यावे. मतदार केंद्रांवर वृद्ध नागरिक, दिव्यांग नागरिक यांना मतदान करण्यासाठी सहाय्यभूत व्हावे , त्याच बरोबर मतदान जन जागृतीसाठी ‘मतदार दूत’ यांची निवड करण्यात येणार आहे. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातुन मतदार दूतांची निवड करावी, यासाठी स्वीप समितीच्या वतीने ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे.
निवडणूक काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या मतदार दूतांचा आदर्श आचार संहितेनंतर गौरव करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकी वेळी केले.
नागरिकांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती आणि मतदान टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा महिला मतदार जनजागृतीसाठी मतदान याविषयावर मेहंदी स्पर्धा घेतली जाणार आहे. शाळा , कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या पालक सभांचे आयोजन करावे या पालक सभांच्या माध्यमातून कुटुंबातील सर्व प्रौढ व्यक्तींना मतदान करण्यासाठी पत्र लिहून आवाहन करावे, तसेच या सभांमध्ये मतदान शपथ घ्यावी. या बैठकीमध्ये ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र आहे अशा शाळांमध्ये वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था असावी त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दिल्या. या बैठकीसाठी स्वीप नोडल अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपजिल्हाधिकारी अनुप यादव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर उपस्थित होते.
ML/KA/PGB 22 March 2024