कबनूरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट , एकाचा मृत्यू
कोल्हापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या महात्मा फुलेनगरमधील अमन फटाका मार्टच्या गोडावूनमध्ये भीषण स्फोट होऊन त्यात त्याचे मालक परवेझ मुजावर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. मुजावर यांच्या मृतदेहावर इचलकरंजीतील इंदिरा
गांधी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
इथल्या कबनूर-कोल्हापूर रस्त्यावरील फुलेनगर इथे मुजावर यांचा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे मुजावर सकाळी गोडावूनमध्ये साफसफाईसाठी गेले होते.गोडावूनचे दार उघडून ते आत गेले. दरम्यान, त्यांना काही समजण्याच्या आतच मोठा स्फोट झाला. त्यांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही , त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सगळा परिसर हादरून गेला. स्फोटाचा आवाज सुमारे २ किलोमीटरपर्यंत दूर गेला होता. या स्फोटात गोडावूनच्या भिंती जमीनदोस्त झाल्या, तर छताचे पत्रे उडून दूरवर फेकले गेले होते.
स्फोटाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. Massive explosion in firecracker factory in Kabanur, one dead
ML/KA/PGB
24 May 2023