पालघरचा विशाल वाळवी पुरुष गटात, राखी राय महिला गटात एसआरटीएल १०० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनचे विजेता
पुणे, दि १८ — छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड–राजगड–तोरणा–लिंगाणा (एसआरटीएल) गडकिल्ल्यांच्या सानिध्यात आयोजित एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. यंदा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचे आठवे वर्ष होते. १०० किलोमीटर अंतराच्या पुरुष गटात पालघरच्या विशाल वाळवी यांनी १० तास ०९ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ नोंदवत नविन विक्रम करून विजेतेपद पटकावले, तर महिला गटात राखी राय यांनी नवा विक्रम करत प्रथम क्रमांक मिळवला. मागील वर्षी १०० किलोमीटर पुरुष गटाचे विजेते ठरलेले हेमंत लिंबू यंदा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विविध अंतर गटांमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेची उंची अधिक वाढवली.
सिंहगडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन राजगड, तोरणा आणि लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या प्राचीन मार्गावर ही मॅरेथॉन दरवर्षी आयोजित केली जाते. यंदाच्या स्पर्धेत भारतासह फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड, नॉर्वे आणि इस्टोनिया अशा नऊ देशांतील धावपटूंनी सहभाग नोंदवला. भारतातील २४ राज्ये व ५५ शहरांमधून ९५० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. १०० किलोमीटर, ५३ किलोमीटर, २५ किलोमीटर आणि ११ किलोमीटर अशा चार अंतर श्रेणींमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
१०० किलोमीटर महिला गटात राखी राय यांनी १८ तास ५४ मिनिटे ३७ सेकंदात शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर स्नेहल योगिता यांनी १९ तास ३९ मिनिटे ५५ सेकंदात दुसरा आणि हेमा आवळे यांनी २३ तास २३ मिनिट ४८ सेकंदात तिसरा क्रमांक मिळवला.
५३ किलोमीटर पुरुष गटात सोम बहाद्दूर थामी यांनी ५ तास ५० मिनिटे ५९ सेकंदात प्रथम, संजय नेगी यांनी द्वितीय आणि ज्ञानेश्वर नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ५३ किलोमीटर महिला गटात सुम्माया लिंबू प्रथम, उर्मिला बाने द्वितीय आणि वीणा तडसरे तृतीय क्रमांकावर राहिल्या. २५ किलोमीटर पुरुष गटात रौनक शेखावत, तर महिला गटात सम्जना राय यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ११ किलोमीटर पुरुष गटात तनय कचरे आणि महिला गटात सुरभी मेरूकर यांनी विजेतेपद पटकावले.
वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत धावपटूंच्या सुरक्षेसह प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक सोयीसुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनचे सदस्य असून, एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन वेळेत पूर्ण करणाऱ्या धावपटूंना फ्रान्समधील यूटीएमबी पात्रतेसाठी आवश्यक गुण मिळतात, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.
छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा या गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील हा मार्ग पूर्वी प्रवास, व्यापार आणि शेतीसाठी वापरला जात होता. आजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून आरोग्य आणि आनंदासाठी धावण्याची प्रेरणा देणारी ही मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य यांचा सुंदर समन्वय साधणारी ठरत आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे पार पडते.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, अॅड. मारुती गोळे, अमर धुमाळ, अॅड. राजेश सातपुते तसेच फाउंडेशनच्या दौंड, हवेली, राजगड, मुळशी, शिरूर तालुका व पुणे शहरातील सुमारे ५०० स्वयंसेवकांनी सलग ४८ तास अथक परिश्रम घेऊन या स्पर्धेचे नियोजन केले. ऍथलीट ट्रेनिंग प्रोग्रॅमचे नेतृत्व कोच योगेश सानप यांनी केले असून त्यांना कोच अनंत कचरे आणि कोच श्यामल मोंडल, कोच चैतन्य वेल्हाळ, व धावपट्टु आनंद हातवळणे यांचे सहकार्य लाभले. पुण्यातील नामवंत अल्ट्रा रनर तारू मतेती आणि उत्कृष्ट धावपट्टू पद्मराज दोशी यांना यावर्षीचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांच्या हस्ते गोळेवाडीतून पहाटे ६ वाजता फ्लॅग ऑफ करण्यात आला.
पूरूष गट व महिला गट विजेता:
१०० किमी पुरुष गट विजेता:
प्रथम क्रमांक: विशाल वालवी
दुसरा क्रमांक: हेमंत लिंबू
तिसरा क्रमांक: प्रीतम राय
१०० किमी महिला गट विजेत्या:
प्रथम क्रमांक: राखी राय
दुसरा क्रमांक: स्नेहल योगिता
तिसरा क्रमांक: हेमा आवळे
५३ किमी पुरुष गट विजेता:
प्रथम क्रमांक: सोम बहादूर थमी
दुसरा क्रमांक: संजय नेगी
तिसरा क्रमांक: ज्ञानेश्वर नाईक
५३ किमी महिला गट विजेत्या:
प्रथम क्रमांक: सुम्माया लिंबू
दुसरा क्रमांक: उर्मिला बाने
तिसरा क्रमांक: वीणा तडसरे
२५ किमी पुरुष गट विजेता:
प्रथम क्रमांक: रौनक शेखावत
दुसरा क्रमांक: ओंकार पाटील
तिसरा क्रमांक: प्रसन्ना भट
२५ किमी महिला गट विजेत्या:
प्रथम क्रमांक: समजना राय
दुसरा क्रमांक: तृप्ती भोसले
तिसरा क्रमांक: शोभा सिंग
११ किमी पुरुष गट विजेता:
प्रथम क्रमांक: तनय कचरे
दुसरा क्रमांक: प्रमोद जगताप
तिसरा क्रमांक: संतोष तेवरे
११ किमी महिला गट विजेत्या:
प्रथम क्रमांक: सुरभी मेरूकर
दुसरा क्रमांक: सयुरी दळवी
तिसरा क्रमांक: नेहा लिल्हारे
KK/ML/MS