बिबट्यांच्या भीतीपोटी लग्नासाठी सोयरिक जुळणे अवघड
पुणे, दि. १२ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घालत अनेकांचे प्राण घेतले आहेत.बिबट्यांमुळं पुणे जिल्हयातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत भयावह परिस्थिती आहे. शिरूर तालुक्यामधील गावांतील केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देऊन सोयरिक जोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला जात आहे. बिबट्यांचा दहशतीचा परिणाम सामाजिक जीवनावरही झाला आहे. गावांतील शेकडो तरुण सुस्थित असूनही त्यांना बिबट्याच्या दहशतीमुळं लग्नासाठी मुली देण्यास नकार दिला जात आहे. मुलांना मुलगी मिळेना म्हणून सोयरा मिळेना म्हणून या तरुणांचे आई-वडील चिंताग्रस्त आहेत.
पुणे जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत १७ बिबट पकडण्यात आले असून हे सर्व बिबटे जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट निवारण केंद्रात’ ठेवण्यात आले आहेत.