खासगी बोटींसाठी मुंबईच्या किनाऱ्यावर ‘मरिना’ तळ
मुंबई, दि. २७ : मुंबई बंदर प्राधिकरणाने खासगी यॉट किंवा बोटींसाठी किनारपट्टीपासून समुद्रात ५२३ मीटर अंतरावर १४ हेक्टरवर ‘मरिना’ उभारला जाणार आहे. या ‘मरिना’चा प्रवेश भाऊचा धक्का परिसरातूनच असेल. यासाठीच्या बांधकामाचा खर्च ४७० कोटी रुपये आहे. मरिना’अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. १०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून ‘मरिना’ची उभारणी होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा जाहीर केली आहे.
घारापुरीची बेटे, बेलापूर किंवा नवी मुंबई, मांडवा, तसेच भविष्यात नवी मुंबई विमानतळासाठी जलमार्गाने ये-जा करणारे स्वत:ची बोट या ठिकाणी उभी करू शकतील. ‘मरिना’साठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, पंचतारांकित रेस्तरॉ, बँका, एटीएम केंद्र, ‘मरिना’वर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत.
‘मरिना’बेस समुद्राच्या आतमध्ये उभारला जाणार आहे. त्यासाठी तेथे भिंत उभी करून लाटा रोखल्या जाणार आहेत. ही भिंत १,४७७ मीटर लांब व ४.८० मीटर रुंद असेल. लहान-लहान खांबांच्या माध्यमातून भिंत उभी केली जाईल.
SL/ML/SL