‘मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणार’..!
![‘मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणार’..!](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250205-WA0013.jpg)
बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आष्टी, बीड येथे ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते बोगदा कामाचा शुभारंभ’ करण्यात आला. यावेळी तेथे उपस्थितांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले.
याप्रसंगी, बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, 2014 साली पहिल्या कार्यकाळात कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच्या 23 टीएमसी पाण्याची फाईल जेव्हा समोर आली, तेव्हा यातील केवळ 7 टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध होते. त्यांनतर, या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करत, निधी देत, यासंदर्भात काम सुरु करण्यात आले. तसेच 2022 साली पुन्हा एकदा सरकार आल्यांनतर, जलसंपदा विभागाची जबाबदारी असताना, सर्वात पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देत, तब्बल ₹11 हजार कोटी निधी कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेला उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील आणि परिसरातील दुष्काळ हा भूतकाळ होणार असल्याचा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
आपल्या संभाषणात पुढे फडणवीस यांनी, राज्य सरकार हे सर्वसामान्य , शेतकरी यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी बांधवांसाठी राज्यात सुरु असलेल्या वीज सवलत आणि सिंचनाच्या इतर सर्व योजनांची सविस्तर माहितीही यावेळी मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु करून, समुद्रात वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणून, विभागाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा, तसेच असे प्रकार अजिबात न खपवता, यावर कडक शासन करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी , इतर मान्यवर उपस्थित होते.
Maharashtra #DevendraFadnavis #Beed
ML/ML/PGB 5 Feb 2025