या मराठी उद्योजकाला ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध मराठी उद्योजक डॉ.धनंजय दातार Dr. Dhananjay Datar यांना मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.डॉ. दातार हे दुबई येथे वास्तव्याला आहेत. ‘अल् अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे Al Adil Trading Co. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या प्रतिष्ठित मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.
मराठी यशवंत पुरस्कार पुरस्कार येत्या शुक्रवारी, २७ ऑक्टोबर रोजी गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८८व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वितरण करण्यात येणार आहे. गिरगावातील डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.
डॉ. धनंजय दातार हे साहित्य संघाच्या यंदाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते चार साहित्य पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. यावेळी ‘उद्योगक्षेत्रातील माझे अनुभव’ या विषयावर डॉ. दातार आपले मनोगत व्यक्त करणार आहे.
डॉ.धनंजय दातार यांचे व्यावसायिक कर्तृत्व
- डॉ. दातार यांनी दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करून आज विविध आखाती देशांत ५० सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली आहे. जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर दुबईत ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’ समूहाचा विकास केला.
- डॉ. दातार यांनी गेल्या ३९ वर्षांत आखाती देशांत आपल्या व्यवसायाचा जम बसवला आहे. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.
- दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’ समूहाने डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) पोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत.
- मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘
- अदील’ समूहाची ५० सुपर मार्केट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत कार्यरत आहे.
SL/KA/SL
24 Oct. 2023