माय मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा नवरात्रीचा पहिला दिवस मराठी भाषेसाठी सर्वांर्थाने सुदिन ठरला आहे. आज केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातल्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. याआधी भारतामध्ये 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. यामध्ये तामीळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्ल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता.
केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!”
फडणवीस यांनी म्हटलं आहे की “मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहेत. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला”.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे मापदंड
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
अभिजात दर्जा मिळाल्या होणार असा फायदा
- अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
- भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं.
- अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात.
- सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते.
प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. - भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
SL/ML/SL
3 Oct. 2024