मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे ला व्हावी

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे ला व्हावी

मुंबई , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा लढा दशकाहून अधिक काळ सुरु आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्याचे पुरावे तसंच त्यासंदर्भातील तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्या वतीने 2013 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे व 2014 मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 21 फेब्रूवारी 2022 रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीही महाराष्ट्र सरकारने पाठवलेला पठारे समितीचा अहवाल योग्य असून तो केंद्र सरकारने स्वीकारला असल्याचे स्पष्ट केले होते. या विषयाशी संबंधित केंद्र सरकारच्या सर्व विभागांनी सकारात्मक अहवाल दिल्याचे आणि अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हाती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पाठपुराव्याची कार्यवाही तातडीने करुन, महाराष्ट्रदिनीच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळेल, हे सुनिश्चित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्राकडून केंद्र सरकारकडे गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाषा, संस्कृती तसेच साहित्यविषयक संस्थाही त्यासंदर्भात वेळोवेळी सनदशीर मार्गाने आवाज उठवत आहेत. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यासंदर्भातील पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्यावतीने 2013 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाकडे आणि 2014 मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. तरीही महाराष्ट्राच्या या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिनही साजरा करण्यात येतो. यादिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करावा, अशी मागणी मी करीत आहे. महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे राजारामशास्त्री भागवत यांनी 1985 मध्येच दाखवून दिले आहे. 1927 मध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास या द्विखंडात्मक ग्रंथात, मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून मराठीच्या साठहून अधिक बोलीभाषा आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई, तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, बहिणाबाई, साने गुरूजींपासून वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, अरुण कोलटकर, विंदा करंदीकर, अण्णा भाऊ साठे, नामदेव ढसाळ, बाबुराव बागूल, भालचंद्र नेमाडे अशा अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. मराठीतील आंबेडकरी साहित्याने जागतिक पातळीवर भारतीय साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे असेही या पत्रात म्हटले आहे.

ML/KA/PGB 25 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *