मराठी हक्कांसाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदानात भव्य धरणे आंदोलन
मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):महाराष्ट्रातील मराठी भाषा, मराठी शाळा, स्थानिक रोजगार, तसेच स्थलांतरितांवरील निर्बंध यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या नेतृत्वाखाली३० जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहितीस्वायत्त महाराष्ट्र अभियानाचे कार्यकारी संयोजक अॅड. सुनील साळुंखे व रवींद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठी शाळांना विना वेतन अनुदान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती,
सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा अनिवार्य करणारा आणि द्विभाषा धोरण लागू करणारा कायदा, उद्योग, व्यवसाय आणि रोजगारांमध्ये स्थानिक मराठी बांधवांना ९०% नोकऱ्या,
रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले, दुकाने यांसाठी १००% परवाने स्थानिक मराठी भूमिपुत्रांसाठी राखीव.
महाराष्ट्रात येणाऱ्या स्थलांतरितांवर निर्बंध घालणारा सक्षम कायदा.आदी मागण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.
स्वायत्त महाराष्ट्र अभियानामध्ये महाराष्ट्र संरक्षण संघटना, लोक संघर्ष संघटना, मी मराठी प्रतिष्ठान, शिवसंस्कार प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, छावा ब्रिगेड, टायगर ग्रुप, मराठा क्रांती दल आणि इतर अनेक संघटना सहभागी आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि महामुंबई शिक्षण संस्था संघटनाही आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
अभियानाचे कार्यकारी संयोजक अॅड. सुनील साळुंखे यांच्यासह रवींद्र फडणवीस, अॅड. योगेश माकन, अॅड. श्रीकांत शिंदे, चेतन राऊत, विजय खवरे, धर्मेंद्र घाग यांसारखे अनेक नेते आणि मराठी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत.
आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रवक्ते पाठवण्याचे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. “मराठीच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात प्रत्येक मराठी बांधवाने व भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सामील व्हावे,” असे आवाहन अॅड. सुनील साळुंखे यांनी केले आहे.
जर शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संयोजकांनी दिला आहे.
ML/ML/PGB 27 Jan 2025