जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर
बीड, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरून वादग्रस्त विधान केलं आणि याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झाला आहे.
शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सध्या जिल्ह्यात सोशल वॉर रंगला असून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. अशातच पोलिसांचा या सर्व परिस्थितीवर वॉच असून शांततेचं आवाहन करण्यात आलेल आहे. मात्र हा सोशल वॉर अद्याप थांबलेला नाही.
आज पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी बंदची हाक दिली गेली असताना दुसरीकडे बीडमध्ये मराठा समाजाने रस्त्यावर उतरत जरांगे पाटील यांचं समर्थन केलं आहे. दशरथ वनवे यांनी केलेले विधान हे आक्षेपार्ह असून त्यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी तसेच त्यांना अटक करावी अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे.
ML/ML/SL
9 June 2024