आंदोलन अटी शर्तींचे पालन करूनच, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा

 आंदोलन अटी शर्तींचे पालन करूनच, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा

मुंबई, दि. १ : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या मराठा आंदोलकांमुळे मुंबई शहरातील व्यवस्थांवर मोठा ताण येत आहे. त्यातच आत्ता गणेशोत्सव सुरु असल्याने मोठ्या जनसमुदायाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नही निर्माण झाला आहे. सरकारने वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करुन देखील मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगेंच्या या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले. आंदोलन अटी शर्तींचे पालन करूनच व्हावे, हुल्लडबाजी करणाऱ्यांना बाहेर काढा, असे आदेश यावेळी न्यायालयाने दिले आहेत.

मुंबईतल्या आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकच आंदोलन करू शकतील. इतर मराठा आंदोलकांनी रस्ते आणि मुंबई मोकळी करावी, असे स्पष्ट आदेश सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने दिले. शिवाय आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका. उद्या दुपारी 4 पर्यंत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांवरच्या आंदोलकांना हटवा, असे आदेश न्यायालयाने दिले.

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात मनोज जरांगे यांचा अर्ज वाचून दाखवला. या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख केला आहे. मात्र, आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. तसेच मनोज जरांगे यांना नोटीस बजावण्यात आली आहे का? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.

माजी सैनिकांना केवळ आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याउलट, राज्य सरकारची बाजू अशी होती की, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती आणि इतरत्र आंदोलन करण्यास परवानगी नव्हती. आंदोलकांनी सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत लेखी हमीपत्र दिल्यानंतरच त्यांना ही परवानगी देण्यात आली, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती आणि त्याच आधारावर ही परवानगी देण्यात आली होती. आझाद मैदान आंदोलनांसाठी आरक्षित आहे, परंतु त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.

पुढे आपली बाज मांडताना राज्य सरकारने म्हटले, गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. तसेच जरांगे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे देखील सरकारने वारंवार सांगितले आहे. शहर एक खेळाचे मैदान झाले असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्तेंची भूमिका

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मी 29 तारखेला तक्रार दिली, आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असे गुणरत्न सदावर्त यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू असल्याची टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *