अबुझमाड कारवाईत तीन माओवादी ठार; सी-६० जवानाला वीरमरण…

 अबुझमाड कारवाईत तीन माओवादी ठार; सी-६० जवानाला वीरमरण…

गडचिरोली दि ६ : अबुझमाडच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून आतापर्यंत तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या कारवाईदरम्यान जखमी झालेल्या सी-६० पथकातील जवान दीपक मडावी यांना उपचारादरम्यान वीरमरण आले आहे. तर आणखी एक जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अबुझमाड परिसरात सुरू असलेल्या अभियानादरम्यान आज सकाळी घटनास्थळावरून आणखी दोन माओवादी — एक पुरुष आणि एक महिला — यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. यासह आतापर्यंत एकूण तीन माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मृत माओवाद्यांकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली असून तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

चकमकीदरम्यान गंभीर जखमी झालेले सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी, वय ३८ वर्षे, रा. अहेरी (मूळ गाव मांड्रा, दामरांचा) यांना पहाटे हेलिकॉप्टरच्या मदतीने अबुझमाडच्या जंगलातून बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून त्यांनी कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करले.

याच अभियानादरम्यान जोगा मडावी, रा. किष्टयापल्ली हे जवान गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या मदतीने भामरागड येथे उपचारासाठी आणण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच गडचिरोली येथे हलविण्यात येणार आहे.
सध्या अबुझमाडच्या जंगल परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असून मोहिम पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांकडून पुढील अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *