पोलिस महासंचालकांसमोर सहा जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण….

गडचिरोली दि २४ : गडचिरोलीच्या घनदाट जंगलात नक्षलवादाविरुद्ध राबविलेल्या सततच्या शोधमोहिमा आणि मोठ्या कॅडरच्या आत्मसमर्पणामुळे हादरलेल्या तब्बल सहा जहाल माओवाद्यांनी आज अखेर शस्त्र खाली ठेवत मुख्य प्रवाहाचा मार्ग स्वीकारला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तीन पुरुष आणि तीन महिला माओवादी सहभागी होते. त्यांच्यावर मिळून तब्बल बासष्ट (६२)लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
आत्मसमर्पणा वेळी भारतीय संविधानाची प्रत भेट देत त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, याच कार्यक्रमात नक्षलविरोधी मोहिमेत धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या ‘C-60’ कमांडोंचा विशेष सन्मान करण्यात आला. जंगलात जीवाची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या या c ६० कमांडोंमुळे गडचिरोलीत शांततेचे आणि विकासाचे नवे क्षितिज उलगडत असल्याचा विश्वास पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केला.
गडचिरोली पोलिस दलाने गेल्या काही वर्षांपासून नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करून नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकासामुळे जिल्हा जलद गतीने प्रगती करत आहे. समाजाच्या या बदलत्या प्रवासात आत्मसमर्पित माओवादीही नव्या सुरुवातीसाठी पुढे येत आहेत, हे संपूर्ण जिल्ह्यासाठी आशादायी आहे.
गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज पुन्हा मोठे यश मिळाले असून सहा जहाल माओवादी मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.
त्यांच्या शरणागतीसोबतच जंगलातील मोहिमेत धाडसी कामगिरी करणाऱ्या ‘C-60’ कमांडोंचा गौरवही झाला. गडचिरोली आता केवळ शांततेकडेच नव्हे, तर ‘स्टील सिटी’च्या दिशेनेही वेगाने वाटचाल करत असल्याचा ठसा या कार्यक्रमातून उमटला.ML/ML/MS