गडचिरोलीत भीषण चकमक, ४ जहाल माओवादी ठार…

गडचिरोली दि २७:– गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी नक्षल चकमक उडाली असून पोलीस व C-60 जवानांच्या धाडसी कारवाईत ४ जहाल माओवादी ठार झाले आहेत.यात १ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. घटनास्थळावरून SLR, INSASसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून चकमक जवळपास आठ तास चालली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
२५ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर आणि छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० आणि इतर माओवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C ६० च्या १९ पथकांसह CRPF च्या २QAT पथका जंगलात रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे दोन दिवसांचा अडथळा निर्माण झाला, पण आज सकाळी जवानांनी शोधमोहीम सुरू केली आणि त्याच वेळी माओवादींकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पोलिसांनीही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देत कारवाई केली.
तब्बल आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर घटनास्थळी चार माओवादी मृतावस्थेत सापडले. त्यात एक पुरुष आणि तीन महिला माओवादींचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक SLR रायफल, दोन INSAS रायफल आणि एक .303 रायफल जप्त केली आहे. या भागात अजूनही उर्वरित माओवादी दडले असण्याची शक्यता असून शोधमोहीम सुरूच असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.ML/ML/MS