स्वमग्नता : मानवी मेंदूच्या विविध अवस्थांचा व्यापक विचार आणि शाश्वत उद्दिष्टांची त्याची सांगड
मुंबई, दि. 2 (राधिका अघोर) :
स्वमग्नता म्हणजेच ऑटीझम हा आजार नसून ती मेंदूची अवस्था आहे, हे समजणे ही ह्या अवस्थेसाठीची पहिली जनजागृती आहे. आज म्हणजेच 2 एप्रिल हा दिवस, वर्ल्ड ऑटिझम अवेरनेस डे म्हणजे, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. यंदाच्या दिनाची संकल्पना आहे, मेंदूच्या विविध अवस्थांचा व्यापक विकार आणि शाश्वत विकास उद्दीष्टांशी त्याची घातलेली सांगड. म्हणजे काय, तर ढोबळमानाने आपण समाजात कमी किंवा चांगला अथवा खूप चांगला IQ म्हणजेच बुद्धिमत्ता निर्देशक असलेल्या व्यक्तींची वर्गवारी करतो.
आपल्या भाषेत, हुशार, मठ्ठ किंवा साधारण बुद्धिमत्तेचे व्यक्ती वगैरे, आणि त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांना कामं दिली जातात,किंवा ते ती निवडतात. मात्र या पलिकडच्या अवस्था किंवा क्षमतांकडे आपलं लक्ष जात नाही,आपण त्याकडे सरसकट आजार म्हणून बघतो.आणि अशा स्वमग्न लोकांना समाज
स्वीकारत नाहीत. त्यांचा विचार केला जात नाही.आधी आपण स्वीकारला पाहिजे, याचा संदेश यंदाची संकल्पना आपल्याला देते.
स्वमग्नता ही जन्मजात असणारी एक मेंदूशी संबंधित मानसिक अवस्था आहे, हा आजार नाही, त्यामुळे त्यावर उपचारही नाहीत. त्यामुळे अशा मुलांची / व्यक्तींची काळजी घेणे, त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळेल, अशाप्रकारे अत्यंत संयम ठेवून त्यांचं संगोपन करायला हवं.
स्वमग्नेतेची लक्षणं दिसत असली, तरीही ती लगेच लक्षात येत नाही. त्याबद्दलची माहिती नसणं, किंवा आपलं अपत्य स्लो learner आहे असं वाटून त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं, अशा गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे आणि या आजाराबद्दल संवेदनशीलता ही आवश्यक आहे.
स्वमग्नता म्हणजे काय? तर बाळ पोटात असतांना, त्याच्या गुणसूत्रांचे एकत्रीकरण होत असताना जन्मण्यापूर्वीच मुलांच्या मेंदूवर तडाखा बसतो. मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि स्नायू संस्था अशा सर्व संस्थांच्या शरीरामधील कार्यपद्धती मेंदूच्या या अवस्थेमुळे दुर्बल होतात. यामुळे, बाळाची वाढ होत असताना त्याच्या सर्व अवयवांवर कमी-अधिक विकलता येते. पहिली दोन वर्षं त्याची लक्षणं दिसत नाहीत, पण वयाच्या तिसऱ्या वर्षी स्वमग्नतेची लक्षणं दिसू लागतात. त्यावेळी अनेकदा पालकांच्या ते लक्षात येत नाही. लक्षात आलं तरीही, हळूहळू होईल, किंवा मूल हट्टी आहे, असं म्हणून ते मुलाला रागावून किंवा जबरदस्तीने काही गोष्टी करायला लावतात. मग मूल अचानक बोलणेच बंद करते. स्वत:च्या गरजासुद्धा बोट दाखवून सांगायला लागते. तरीही, अनेकदा साध्या डॉक्टरांना दाखवणे किंवा घरच्या वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने घरगुती औषधोपचार करणे, अशा गोष्टी सुरू राहिल्यामुळे, मूळ समस्या लक्षात येत नाही, आणि म्हणून त्यावर नीट उपाययोजनाही होत नाहीत.
स्वमग्नता किंवा ऑटिझम ही अवस्था कधीही बरी होणारी नाही. मात्र, प्रत्येक मुलात त्याचं त्याचं काहीतरी वैशिष्ट्य, कसब असतं. ते लक्षात घेऊन, संयमाने त्याला त्याच दिशेने पुढे नेलं, तर ही मुलंही अचाट कामगिरी करु शकतात.
काही वर्षांपूर्वी अगदीच नवीन असलेल्या या विषयावर, अनेक समाजसेवी संस्था आणि संवेदनशील लोकांच्या प्रयत्नांमुळे स्वमग्न मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. ऑटिझमचे आजचे चित्र पाहिले, तर गेल्या काही वर्षांत या मुलांची प्रगती होऊन ती या प्रकारच्या विविध शाळांमधून पुढे शिकत आहेत. स्वमग्न मुलांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना तेच तेच काम करायला आवडते, त्याचा कंटाळा येत नाही. उलट त्यांचा मेंदू त्यामुळे शांत राहातो. त्यांना सर्व वस्तू जिथल्या तिथेच ठेवायला आवडतात. ते उत्साहाने एकच काम करु शकतात. या वैशिष्ट्याचा विचार करून, त्यांना रोज एकाच साच्यातले सोपे काम देऊन व्यस्त ठेवता येतं आणि त्यांचाही वेळ त्यात छान जातो.
या विषयाबद्दल फारशी माहिती नाही, तसंच या समस्येवर काही औषधोपचार देखील नाहीत, त्यामुळे अनेक पालक अशा मुलांच्या बाबतीत निराश होतात, चिडचिडे होतात. आपल्यावरचा हा डाग आहे, असा समज करून घेत, आपल्याच मुलांशी नीट वागत नाहीत. कधीकधी घरात एकट्या आईवर अशा मुलांची जबाबदारी येते. तीही थकून जाते. पालकांचं आयुष्य त्यात गुंतून गेल्यामुळे त्यांचं नातं बिघडू शकतं. अशा वेळी समाजाने, कुटुंबाने अशा पालकांसोबत उभं राहायला हवं. त्यांना वेळ द्यायला हवा. पालकांचंही समुपदेशन व्हायला हवं. अलीकडे अशा स्पेशल मुलांसाठी विकसित झालेल्या शाळा आणि इतर केंद्र पाहता आता अशा मुलांच्या पालकांना, मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे.
या मुलांसाठी अजूनही खूप करण्यासारखे आहे. यासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्या हातांची कमतरता आहे. विशेषत: तरुण वर्ग यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून काही मर्यादा येतात. त्या पलीकडे पोहोचण्याची गरज आहे. अशा मुलांच्या विश्वात आपण पोहोचण्याची गरज आहे. त्यांच्याशी संयमाने वागणे, त्यांना सतत गोष्टी, गाणी ऐकवणे, त्यांच्याशी सतत बोलत राहिलं तर ही मुलं समाजात मिसळण्यास मदत होईल. अशा मुलांच्या शारीरिक हालचाली मर्यादित असतात. त्यामुळे त्यांचं वजन वाढणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवं, त्यांचा आहार ठरवतांना त्यात जंक फूड नको, त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. थोडी काळजी, संयम आणि प्रेम या तून अशा मुलांची समस्या हाताळली जाऊ शकते.
ML/ML/PGB 2 April 2025