मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी की थेट नागपुरात….
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 तारखेला होणे अपेक्षित असताना अद्याप त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नसून त्यामुळे विस्तार 14 तारखेला म्हणजेच शनिवारी होईल की थेट नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केला जाईल याबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचे बैठक उद्या होणे अपेक्षित असून त्यात यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाईल.
5 डिसेंबरला राज्याचे नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. त्यात केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तिघांचा शपथविधी झाला त्यामुळे मंत्रिमंडळातील समावेशासाठी आस लावून बसलेल्या तिन्ही पक्षातील अनेक आमदारांचा हिरमोड झाला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये निवडून आल्यामुळे तिन्ही पक्षातल्या अनेक आमदारांना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्यात नव्याना अधिक संधी मिळावी अशीच अपेक्षा तिन्ही पक्षातल्या आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची एकूण संख्या 43, ही लक्षात घेता त्यातील तिघांचा शपथविधी आधीच झालेला आहे. आता केवळ 40 जागा मंत्रिमंडळामध्ये शिल्लक असून त्यात नेमके कसे वाटप होईल यासंदर्भात अद्याप स्पष्टता आलेली नाही. भाजपाचे जास्त आमदार निवडून आल्यामुळे सहाजिकच त्यांची संख्या 20 ते 22 मंतीपदांची असणार आहे . शिंदे यांच्याकडे 11 ते 13 तर अजित पवार यांच्याकडे आठ ते दहा अशी मंत्रिपदे असतील अशी चर्चा आहे. मात्र या संदर्भातला नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
गेल्या दोन दिवसांमध्ये महायुतीतील नेत्यांची बैठक झालेली आहे. त्यात मंत्रिमंडळातील जागांबद्दल देखील चर्चा झाल्याचे समजते. यात तिन्ही पक्षांना नेमक्या किती जागा द्यायच्या या संदर्भात काही तडजोडही झाली आहे, त्यापैकी काहींना म्हणजेच घटक पक्षांना केंद्रातही मंत्रीपद मिळू शकते त्या बदल्यात राज्यातील मंत्रिमंडळात त्यांना कमी जागा दिल्या जातील . आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीसाठी घेत आहेत तर एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच आहेत .
तिन्ही पक्षातील अनेक आमदार नवीन चेहऱ्याला संधी द्या असा आग्रह धरून बसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी तर एकत्रित शिवसेनेत मंत्री बनलेल्या कोणालाही संधी देऊ नये, यापुढील सर्व संधी नवीन चेहऱ्याला मिळावी असा आग्रह धरला आहे. भाजपातही वरिष्ठ चेहऱ्याला संधी न देता नव्यांना संधी द्या असा एक मतप्रवाह आहे. अजित पवारांकडे मात्र अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरा नेमका कसा असेल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
ML/ML/PGB 11 Dec 2024