मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सूत्रधार कोण, शोधण्यासाठी एस आय टी चौकशी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणाची फूस होती, त्याचा सूत्रधार कोण, चिथावणीखोर भाषा आणि हिंसक आंदोलनं यामागे नेमके कोण , कोणाच्या पैशातून हे आंदोलन सुरू राहिले या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घेण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
विधानसभेत भाजपाच्या आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला.महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा मनोज जरांगे यांनी काल केली आहे, त्यासोबतच याबाबतच्या याचिकेवर सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये अशी टीपणी कालच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे,
या पार्श्वभूमीवर बेचिराख करण्याची तयारी झाली आहे का, ही धमकी आहे का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपमानास्पद विधाने , तुला निपटून टाकू अशी भाषा कितपत योग्य, आधी छगन भुजबळ, आता फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री यांच्यावर अतिरंजित भाषेचा वापर होत आहे, यामुळे सदनाच्या गरिमेला धक्का बसतो आहे, यामुळे काळ सोकावतोय हे लक्षात घ्यायची गरज आहे अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी सभागृहात केली.
बेचिराख करण्याची तयारी कोणी केली आहे, अशा धमक्या देण्याची वृत्ती शोधून काढायला हवी, हे कटकारस्थान शोधून काढले पाहिजे असेही शेलार म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची सभा उधळून लावण्याची धमकी दिली जात आहे, कोण तुम्ही असा आमचा सवाल आहे. मराठा समाजाचा ठेका एकाच व्यक्ती ला दिलेला नाही, जरांगे राहतात कुठे , कोणता कारखाना त्यांना पाठिंबा देतो हे शोधण्याचे काम विशेष तपास पथक नेमून करा अशी मागणी त्यांनी केली
आम्ही यात कुठेच नव्हतो , संवाद सरकारशी सुरू होता त्यांचा , नवी मुंबईत गुलाल उधळला, मग पुन्हा आंदोलन सुरू का झालं, विरोधकांशी सरकारनं चर्चाच केली नाही , आम्हाला जाळपोळ , दगडफेक नकोय, त्यांच्या भाषेचं बिलकुल समर्थन करणार नाही, मात्र ही परिस्थिती निर्माण का झाली हेही समजून घेण्याची गरज आहे असे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणाले. आम्ही केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही , पण त्याच्या तळाशी जायला हवं, ही परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण काय , महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा सहन करत नाही, मात्र पोलिसी बळाचा वापर योग्य नव्हता , चुकीच्या वक्तव्य करणाऱ्या आणि हिंसक आंदोलन करणाऱ्या बद्दल सरकारने जरूर केली पाहिजे असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
हे सुरू असतानाच सत्तारूढ सदस्य एस आय टी ची मागणी करत आक्रमक झाले, जागा सोडून पुढे गेले , गदारोळ झाला त्यामुळे गोंधळ झाला, सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली, आपण मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण टिकवले, सारथी , आण्णासाहेब आर्थिक महामंडळ आदी बाबी मधून समाजाला मदतच केली, मात्र कोणाच्याही आया बहिणी काढणं योग्य आहे का असा सवालही त्यांनी केला, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांचे नाव घेत अशी भाषा वापरणे कसे चालेल, मात्र दोष जरांगे यांचा नाही , त्यांचा बोलविता धनी कोण आहे, आमदारांची घरे जाळणे , त्यांना उद्युक्त केलं, झालेला लाठीमार अयोग्यच पण तो का झाला , त्यांच्यामागे पैसे कोणाचे , कोण मदत करतेय याची चौकशी व्हायलाच हवी असे फडणवीस यांनी सांगितले.
सभागृहाने या गंभीर सर्व मुद्द्यांची नोंद घेतली आहे, विरोधी पक्षनेते यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे, हिंसक वक्तव्ये आणि कृती सहन करता येणार नाही, यामुळे समाजात योग्य संदेश जाण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करण्याचे निर्देश यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले.
या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले. विरोधकांनी सभात्यागही केला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते आज प्रवीण दरेकर यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसंच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला त्या आर्थिक व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली. जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार आणि षडयंत्र रचण्यामागे राजेश टोपे यांचा हात असल्याचार दावा जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे याकडे लक्ष वेधत या दाव्यांची चौकशी करावी अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
ML/KA/SL
27 Feb. 2024