मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, वेशीवर येऊन थडकले

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी जालन्याहून मुंबईकडे निघालेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी सरकार कडून सुरू असलेली मनधरणी निष्फळ ठरली आहे, त्यामुळे आपण मुंबईत जाणारच असे सांगत त्यांनी सोबतच्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईची वेश गाठली असून ते नवी मुंबईत थडकले आहेत.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे , ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगे सोयऱ्यानाही आरक्षण द्यावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारला २२ जानेवारी पर्यंतची वेळ दिली होती मात्र या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईची वाट धरली असून आज सकाळी ते लोणावळा इथे थांबले होते. आता ते नवी मुंबईत खारघर येथील मैदानात थडकले आहेत.
जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारच्या वतीने आ बच्चू कडू यांनी अनेकवेळा मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा त्यांच्याशी चर्चा करून काही सरकारी निर्णय घेतलेले दाखविले देखील मात्र त्याने समाधान न झाल्याने जरांगे मुंबईकडे निघाले आहेत.
आज सकाळी जरांगे यांच्याशी लोणावळा इथे छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तांनी चर्चा केली मात्र स्वतः मुख्यमंत्र्यानी चर्चा करून यातून मार्ग काढावा अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील गावी असून आज त्यांची प्रत्यक्ष चर्चा होऊ शकलेली नाही यामुळे संतापून जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली.
दरम्यान जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केल्याने इथले जनजीवन विस्कळित होईल त्यामुळे त्यांना इथे आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात काल करण्यात आली होती. त्यावर सरकार आणि जरांगे यांना नोटिसा बजावल्या नंतर पोलिसांकडून जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. तर जरांगे यांचे वतीने आझाद मैदानात मोजक्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करू , तिथेच उद्या झेंडावंदन करू नेमून दिलेली जागा सोडून जाणार नाही अशी भूमिका उच्च न्यायालयात मांडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून हे आंदोलन कुठल्या दिशेने जाते ते पहायचे.
ML/KA/PGB
25 Jan 2024