मनोहर जोशी — एक आठवण , पोलिसाच्या चष्म्यातून
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :साधारण 1996 साली SPU ( विशेष सुरक्षा विभाग ) येथे नेमणुकीस असताना सरांकडे सुरक्षा अधिकारी म्हणून काम करण्याचा योग आला. ( त्यांना सर ह्याच नावाने सर्वत्र संबोधित करण्यात येत असे )
पोलिस अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाडीत पुढील सीटवर बसण्याचे भाग्य मला मिळाले . त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडातील साधारण तीन वर्षाचा कालावधीत मी त्यांना फार जवळून पाहिले.
प्रशासनावरील त्यांची पकड एव्हढी मजबूत होती , की शासकीय फाईल वर सही करताना , मुख्यमंत्री म्हणून विविध अँगलने विचार करून निर्णय घ्यावा लागतो. तो ही कमी वेळात आणि अचूक असावा लागतो. एक तर ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते. एकच वेळी विरोधक , स्वतःची पार्टी , युती केलेली पार्टी आणि त्याच वेळी प्रशासकीय अधिकारी ह्या सर्वांना सांभाळून निर्णय घ्यावे लागतात. त्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना ( IAS/ IPS) सांभाळणे हे फारच मुश्किल काम असते.
त्या वेळी सरांचे प्रधान सचिव अरुण बोंगीरवार हे होते.
शासकीय काम करताना फाईल काढण्याचे कामात दोघांची मेहनत मी फार जवळून पाहिली. विमानतळ ते वर्षा बंगला (मुख्यमंत्री निवास). गाडीने हा प्रवास साधारण 25 मिनिटाचा .प्रवासात फाईल चे तीन बस्ते सहजतेने संपत होते.( बस्त म्हणजे फाईल ठेवण्याची जाड कपड्याची पिशवी ). गाडीत पोलिस अधिकारी (PSLO Personal Security and Lisaning officer ) पुढील सीट वर, त्यांच्या मागे मुख्यमंत्री साहेब , त्यांच्या शेजारी बोंगिरवाऱ साहेब. फाईल चे बस्ते PSLO चे पाय जवळ असत. फाईल वर सही झाली की, ती PSLO कडे देण्यात येई. फाईल चे प्रमाण इतके होते की , त्यांना फाईलेरिया झाला आहे असे आम्ही गंमतीने त्यावेळी म्हणत होतो.
त्या काळी मोबाईल फोन नव्याने आला होता. प्रथम पेजर होते. मुख्यमंत्र्यांचा पेजर PSLO कडे असायचा. काही संदेश असेल तर त्यावर यायचे.कालांतराने मोबाईल आला. मुख्यमंत्र्यांचा मोबाईल PSLO कडे असायचा. एक कॉल Rs 17 होता. त्यावर फोन घ्यावे लागत.कधी मुख्य सचिव दिनेश अफझलपुरकर, आधी मा.बाळासाहेब कधी DG इत्यादी. ते फोन घेणे तसेच फोन जोडणे हे काम PSLO कडे म्हणजे माझ्याकडे असायचे ( फोन लावला जात नाही तर. तो जोडला जातो – ही सरांची शिकवणूक)
शासकीय विमान , हेलिकॉप्टर ने सरांसोबत अनेक दौरे झाले. तेथे दिलेला त्यांचा बिन साखरेचा चहा आजही लक्ष्यात आहे. सकाळी लवकर दौरा असेल तर चहा सोबत त्यांना लागणारी खारी ती मग कुस्करून चहात टाकून खाण्याची त्यांची सवय आजही आठवते.
आषाढी एकादशीला पहाटे 02.30 वाजता सपत्नीक दर्शनाचा आणि पूजेचा मान सरांनी आणि अनघा मॅडम घेताना , मला देखील गाभाऱ्यात दर्शन घेता आले .असा मानसन्मान सरांमुळेच मिळाला. ते ही सलग तीन वर्ष.
एखाद्यावर मार्मिक विनोद कसा करावा हे सरांकडून शिकावे. समोरचा दुखावला जाणार नाही आणि खेळीमेळीने संवाद होईल ह्या वर त्यांचे लक्ष्य असे. त्यामुळेच की काय त्यांची आणि बाळासाहेबांची गाढ मैत्री असावी. सोबत प्रमोद नवलकर होतेच. सरांमुळेच मा.बाळासाहेबांचं प्रत्यक्ष दर्शन तसेच त्यांच्या शी प्रत्यक्ष संवाद करता आला. ह्याला ही भाग्य लागते. सरांच्या खाजगी आणि सरकारी गाड्यांचे क्रमांक नेहमी 4444 असे होते. कदाचित 7 हा त्यांचा लकी नंबर असावा.
वक्तशीरपणा सरांकडूनच शिकावा. कॅबिनेट मीटिंग दर मंगळवारी सकाळी 09.00 वाजता असायची. वर्षां ते मंत्रालय हे अंतर 22 मिनिटात पार व्हायचे. कॅबिनेट दिवशी बरोब्बर 08.30 वाजता सर बंगल्यातून बाहेर पडत. त्या मुळे उपमुख्य मंत्र्याची आणि इतर मंत्री , शासकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडायची. सरांचे हालचालींवर कोणीही आपले घड्याळ सेट करावे. किती हा वक्तशीरपणा.
त्यातील काही अंश जरी आपल्या अंगी आला तरी खूप झाले. त्यांच्या राजकीय प्रवास अथवा खाजगी जीवनाबद्दल लिहिण्या इतका मी मोठा नाही.
सरांचे मुख्यमंत्री असतानाचे उप सचिव अविनाश धर्माधिकारी , खाजगी सचिव सुभाष लाखे, अविनाश सुभेदार, राजेंद्र पाटील, कोळसे पाटील ह्यांच्या कडे तसेच
सरांचे स्विय सहाय्यक साप्ते आणि महाडिक त्यांचे खाजगी गाडी चालक दिलीप आणि प्रफुल धुमाळ ह्यांच्या देखील सरांबद्दल अनेक आठवणी आहेत. पोलिस विभागातील पो नि विनय करकरे, सुनील बाबर, संजीव भोळे , सुनील घोसाळकर, सुशील कांबळे, अंकुश काटकर संदीप भगडिकर, विजय खैरे इत्यादी चे देखील सरांबद्दल अनेक आठवणी असतील. त्यातील काही आठवणी मी लिहिल्या आहेत.
असे हे बहु आयामी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्या आड गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
— चंद्रशेखर सावंत
सहाय्यक पोलीस आयुक्त ( निवृत्त ), मुंबई पोलीस
ML/KA/PGB 23 Feb 2024