डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे काल एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजे तिरंग्यात लपेटून त्यांना मानवंदना देण्यात आली. मनमोहन यांचे पार्थिव उद्या काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात येणार असून, तेथे सर्वसामान्य लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. उद्या, २८ डिसेंबरला सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शोक ठराव मंजूर करण्यात आला.आज संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात CWC ची बैठक झाली, ज्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बेळगावीहून काल रात्री उशिरा दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे थेट मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी गेले. राहुल यांनी X वर लिहिले- मी माझा मार्गदर्शक आणि गुरु गमावला आहे.
डॉ. सिंग यांची अंत्ययात्रा शनिवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीतील एआयसीसी (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) मुख्यालयातून निगमबोध घाटाकडे निघेल. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले – डॉ. सिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानातून AICC मुख्यालयात आणले जाईल, जिथे लोक आणि काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत त्यांना श्रद्धांजली वाहतील.
दरम्यान डॉ. सिंग यांच्या मुली आज संध्याकाळपर्यंत अमेरिकेतून भारतात येतील. अंतिम संस्काराच्या ठिकाणाबाबत पंतप्रधान कार्यालय (PMO) निर्णय घेणार आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय शोक व्यक्त होत असल्याने शनिवारी राष्ट्रपती भवनात होणारा चेंज ऑफ गार्ड सेरेमनी होणार नाही. ही लष्करी परंपरा आहे. यामध्ये राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा एक गट दुसऱ्या गटाकडून पदभार घेतो. दर आठवड्याला याचे आयोजन केले जाते. माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील.
SL/ML/SL
27 Dec. 2024