मणक्याच्या क्षयरोगाने ग्रस्त २२ वर्षीय तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वि
मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क):मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या, त्यातून अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मीळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला बरे करण्याची किमया महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रूग्णालयाने स्पाइन क्लिनिकच्या सहकार्याने साध्य करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दहा दिवसात ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे. व्ही. एन. देसाई महान पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांनी सांगितले की, मणक्याच्या व्याधीने ग्रस्त एक २२ वर्षीय तरुणी मागील आठवड्यात व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रूग्णालयात दाखल झाली. या महिलेला चालता येत नव्हते, पायांची हालचाल करता येत नव्हती. महिनाभर त्या अंथरूणास खिळून होत्या. त्यामुळे मुत्राशय आणि ओटीपोटावर देखील परिणाम झाला होता. सर्वात महत्वाचे म्हणजे, स्थानिक ढोंगी वैद्याकडून झालेल्या बनावट उपचारांमुळे या तरुणीचा हा आजार बळावला होता.अगदी तरुण वयात आजाराने बेजार झालेल्या ह्या तरुणीच्या आजाराचे संपूर्ण निदान करण्यासाठी एम.आर.आय. (MRI) तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार, या तरुणीला मणक्याचा क्षयरोग झाल्याचे तसेच त्यामुळे मणक्यातील विविध नसांवर दाब निर्माण झाल्याचे आढळले. एकंदरीत, आजाराने धारण केलेले तीव्र रूप हे क्वचित आढळणारे असे होते. या आजारातून तरुणीला बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय समोर होता. मात्र तो अत्यंत खर्चिक होता. रुग्णाची आर्थिक स्थिती देखील साधारण स्वरूपाची होती. अशा स्थितीत स्पाइन फाऊंडेशनने, रूग्णालयात कार्यरत स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून सहकार्याचा हात पुढे केला. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तसेच स्पाइन क्लिनिकचे रुग्णालयातील मानद वैद्यकीय सल्लागार, मणक्यांच्या विकारातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद यांनी संयुक्तपणे ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानंतर, या तरुणीच्या मणक्यावर डिकाॅम्प्रेशन व हार्टशील फिक्सेशन शस्त्रक्रिया (Spine Decompression and Hartshill fixation surgery) यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुस-याच दिवशी ही तरुणी स्वत:च्या पायावर उभी राहू शकली, तर अवघ्या दहा दिवसात त्या कमीत कमी आधार घेऊन चालू लागल्या आहेत. रुग्णाचे मुत्राशय व ओटीपोट पूर्ववत झाले आहे. तरुण महिला आजारातून पूर्णपणे बरे सावरून चालू लागली.पाठीचे विशेषतः मणक्याचे कोणतेही विकार, दुखणे असल्यास विशेषज्ञ अशा वैद्यकीय तज्ज्ञांचा तातडीने सल्ला घ्यावा. स्थानिक भोंदू लोकांकडून उपचार घेऊ नयेत, अन्यथा आजार बळावतात, त्यातून दुर्धर स्थिती होवू शकते, असे आवाहन यानिमित्ताने व्ही. एन. देसाई महानगरपालिका रुग्णालयाने केले आहे.
ML/KA/PGB 30 APR 2023