आपचे मनिष सिसोदिया यांना अटक

नवी दिल्ली, दि.२६( एमएमसी न्यूज नेटवर्क): सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (२७ फेब्रवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सिसोदिया यांनी याआधीच त्यांच्या अटकेची शक्यता असल्याचे म्हटले होते. तसेच मी सात ते आठ महिन्यांसाठी तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या अगोदर दिल्लीत ७२० दारूची दुकाने होती. त्यापैकी २६० खासगी दुकाने होती. मात्र, नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
SL/KA/PGB26 Feb 2023