ठाकरे आणि शरद पवार गटांचे जाहीरनामे प्रकाशित

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांचा प्रचार जोरदार सुरू असताना विविध राजकीय पक्ष मतदारावर आश्वासनांची बरसात करत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे जाहीरनामे आज प्रसिद्ध झाले.

शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रय़त्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

महाराष्ट्राला वित्तीय संस्थांचं केंद्र करणार असल्याचं आश्वासन ठाकरेंनी दिलं. देशात आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दुजाभाव न करता सर्व राज्यांना समान विकासाची संधी देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मागच्या काही दिवसांपासून राज्यातली आरोग्य यंत्रणा ढेपाळली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं आश्वासन ठाकरे गटाने जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे.

शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार आहोत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु आणि शेतकऱ्यांना गोदामं देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीपासून ते महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये गॅसच्या किमती कमी करून त्या 500 रुपयांपर्यंत आणल्या जातील आणि गरज पडली तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू असं देखील जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यात म्हटलं आहे

SL/ML/SL

25 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *