मंगेशकर रुग्णालयाला उपरती,या केसेसमध्ये डिपोझिट नाही

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिपॉझिट न भरल्यामुळे तनिषा भिसे नामक गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आता इमर्जन्सी अथवा प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गत दोन दिवसांपासून या रुग्णालयावर होणाऱ्या चौफेर टीकेची धार आता काहीशी बोथट होण्याची शक्यता आहे.
तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या रुग्णालयावर चौफेर टीकेची झोड उठली होती. सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी या रुग्णालयाविरोधात आंदोलन केले. त्यानंतर सरकारनेही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या विश्वस्तांनी वरील निर्णय घेतला.
दीनानाथ रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी एका निवेदनाद्वारे विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार, तनिषा भिसे यांचा मृत्यू एक दुर्दैवी घटना आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाची मान खाली गेली आहे. आता येथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट घेतले जाणार नाही. मग सदर रुग्ण डिलिव्हरी विभागात आलेला असो किंवा मुलांच्या विभागात आलेला असो. प्रस्तुत रुग्णालय सर्वच गरीब व गरजू रुग्णांची मदत करण्याचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करत आहे.
SL/ML/SL
5 April 2025