श्री देव कुणकेश्वर मंदिरात हापूस आंब्याची आरास
सिंधुदुर्ग, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले होते. या आंबा महोत्सव निमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिरात ११,१११आंब्यांची आरास करण्यात आली आहे .
श्री देव कुणकेश्वराच्या शिवलिंगाभोवती गाभाऱ्यात देवगड हापूसची आरास करून सजावट केलेली आहे. त्याचबरोबर मंदिरातील बाहेरील नंदीगाभाऱ्यात देखील देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली.देवगड हापूस आंब्याच्या आरासी मुळे श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात देवगड हापूसचा सुगंध दरवळत होता. दरवर्षी ११ मेला श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
परिसरातील आंबा बागायतदार आपल्या बागेत पिकवलेल्या हापूस आंबा श्री देव कुणकेश्वर मंदिरात आणून देतात.त्यातूनच ही कुणकेश्वर मंदिरात हा आंबा महोत्सव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून साजरा होऊ लागला. देवगड तालुक्यातील छोटे,मोठे आंबा बागायतदार श्री देव कुणकेश्वराकडे साकडे घालून जातात त्यानंतर येणाऱ्या हंगामात श्री देव कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळे आंबा पीकाचे उत्पंन मोठ्या प्रमाणात मिळतेही.ते आंबा बागायतदारही देवगड हापूसच्या पेट्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात स्वखुशीने या महोत्सवासाठी आणून देतात. त्यामुळेच आता या आंबा महोत्सवाला मोठे स्वरूप येताना दिसत आहे.
यावर्षी कुणकेश्वर आंबा महोत्सव २०२३ हे ८ वे वर्ष आहे.मात्र यावर्षी ऋतुचक्राच्या बदलामुळे आंबा पीकच कमी आहे.तरीही सर्व आंबा बागायतदारांनी स्वतः आंबे आणून दिले आणि त्यातूनच हा यावर्षीचा आंबा महोत्सव संपन्न होत आहे.या आंबा महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आंबा बागायतदार, भाविकांचे, कुणकेश्वर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष संतोष लब्दे यांनी आभार व्यक्त केले.
ML/KA/PGB 11 May 2023