माघी गणेशोत्सवाच्या मंडपाचे शुल्क माफ
मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क): माघी गणेशोत्सवाच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून परिपत्रक उशिरा निघाल्याने ज्या मंडळांनी मंडपासाठी शुलक भरले असेल तर ते पालिकेतर्फे परत केले जाणार आहे . यंदाचा माघी गणेशोत्सव आजपासून सुरु होणार असून या बाबतीत पालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे .
महापालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली असून फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणा-या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित होण्यापूर्वीच माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली गेली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश २३ जानेवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकांन्वये देण्यात आले आहे.
माघी गणेशोत्सवा दरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिसांची असलेली व्यग्रता, या सर्व बाबी विचारात घेऊन माघी गणेशोत्सवासाठी प्राप्त होणा-या अर्जांपैकी ज्या मंडळांना गतवर्षी परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक व वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांमार्फत छाननी करुन परवानगी देण्यात येणार आहे. नव्याने व प्रथमतः अर्ज करणा-या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक व वाहतूक पोलिसांचे ना -हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे .विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे
कोविड – १९ किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, सदर परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारणे बंधनकारक असणार आहे.
ML/KA/SL
24 Jan. 2023