‘मनाचे श्लोक’ आता नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १४ : ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या नावामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट आता नव्या नावाने, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने हिरवा कंदील दाखवूनही काही संघटनांनी प्रदर्शनात अडथळे आणल्याने निर्मात्यांनी अखेर एक मोठा निर्णय घेतला आहे. मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून त्याच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे.
‘मनाचे श्लोक’ या शीर्षकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आक्षेप घेत काही संस्थांनी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण गोंधळामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच सार्वजनिक मालमत्ता किंवा चित्रपटगृहांचे नुकसान टाळता यावे, यासाठी निर्मात्यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा चित्रपट येत्या गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी ‘तू बोल ना’ या नावाने चित्रपटगृहांत दाखल होत आहे.
निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांगितले, “गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते. परंतु, रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमे आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीने आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा दिला. हे पाठबळ आमच्यासाठी खूप मोलाचे होते.”
SL/ML/SL 14 Oct. 2025