धक्कादायक, परळी वैजनाथाच्या प्रवेशद्वारावरच शिजवला मांसाहार
परळी, दि. 1 : बीड जिल्ह्यातील परळीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत बांधकाम सुरु आहे. मात्र वैजनाथ मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावरच मांसाहारी पदार्थ शिजवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. येथे बांधकामाचं कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी चक्क मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पूर्व पायऱ्यावरील नियोजित दर्शन मंडपातच चूल मांडून आम्लेट मांसाहारी अन्न शिजवताना दिसून आले. संतापजनक प्रकार कॅमेरात कैद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी मंदिराच्या आवारामध्ये मांसाहारी पदार्थ शिजवल्याचा प्रकार कॅमेरात कैद केला. मंदिर परिसरात कामे करताना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा सूचना लोकप्रतिनिधींकडून वारंवार दिल्या जातात. असं असतानाही हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वैजनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणारे मांसाहारी पदार्थ शिजवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाकडून त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.