रात्रभर सुरू ठेवता येणार मॉल, रेस्टाॅरंट, चित्रपटगृहे

 रात्रभर सुरू ठेवता येणार मॉल, रेस्टाॅरंट, चित्रपटगृहे

मुंबई, दि. 2 :

राज्य सरकारने राज्यभरातील मॉल्स, दुकाने, चित्रपटगृह २४x७ उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. सणासुदीला दुकाने २४ तास सुरू राहणार असल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढणार असून ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. मद्य विक्री व मद्य दिली जाणारी आस्थापने वगळता अन्य व्यावसायिक आस्थापनांना स्थानिक प्रशासनाने लावलेल्या अटींशिवाय २४x७ सुरू ठेवता येणार आहेत. याबाबत बुधवारी राज्य कामगार विभागाने परिपत्रक काढले आहे.

राज्य सरकारकडे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या की, पोलीस व स्थानिक प्रशासन आस्थापने २४x७ चालवू देत नाहीत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापने अधिनियम, २०१७ च्या कलम २ (२) नुसार, कोणत्याही आस्थापनाचा दिवस मध्यरात्रीच्या ठोक्यापासून पुढील २४ तासांचा असतो. त्याचप्रमाणे, कलम १६(१) मध्ये नमूद आहे की, आस्थापने आठवड्याचे सर्व दिवस सुरू ठेवता येतात; मात्र त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलग २४ तासांची सुट्टी देणे बंधनकारक आहे. जरी कायद्यानुसार सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स २४x७ सुरू ठेवता येऊ शकतात, तरीही स्थानिक प्रशासन आणि पोलीस हे उघडण्याची व बंद करण्याची वेळ पाळण्याचा आग्रह धरत होते. कोणती आस्थापना विशिष्ट वेळेनंतर सुरू ठेवता येणार नाहीत याबाबत गोंधळ निर्माण झाला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याने ३१ जानेवारी २०२० रोजी स्पष्ट केले की, फक्त दारू विक्री किंवा सेवा देणाऱ्या आस्थापनांनाच ठराविक वेळेचे बंधन राहील. या स्पष्टतेनंतरही पोलिस व स्थानिक प्रशासन सर्व आस्थापने २४x७ चालवण्यास आडकाठी करत असल्याचे दिसून आले. आता १ ऑक्टोबर रोजी राज्याने काढलेल्या परिपत्रकामुळे हा गोंधळ संपेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

यामुळे मॉल्स, कॉम्प्लेक्स तसेच (दारू न देणारी/न विकणारी) रेस्टॉरंट्सही २४x७ सुरू ठेवता येतील. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काढलेले हे राज्याचे परिपत्रक व्यापाऱ्यांना आनंद देणारे ठरणार असून दिवाळी आणि नाताळ सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांनाही मोठी सोय होणार आहे. यासोबतच ग्राहकाभिमुख वस्तू व सेवांवरील जीएसटी दरात करण्यात आलेल्या कपातीमुळेही राज्य सरकारचा हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *