मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
मुंबई, दि. 10 : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य पाच आरोपींची निर्दोष सुटका केली होती. मात्र, या निर्णयाला आता बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या अपिलात असा दावा करण्यात आला आहे की, तपासात झालेल्या त्रुटी किंवा दोषपूर्ण तपास हे आरोपींना निर्दोष ठरवण्याचे कारण ठरू शकत नाही. बॉम्बस्फोटाचा कट गुप्तपणे रचण्यात आल्यामुळे थेट पुरावे मिळणे कठीण होते, परंतु परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींचा सहभाग सिद्ध होतो, असा युक्तिवाद अपिलात मांडण्यात आला आहे.
या अपिलावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अपिलकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, विशेष न्यायालयाने केवळ “पोस्टमन”सारखी भूमिका घेतली आणि सरकारी पक्षाच्या अपयशामुळे आरोपींना फायदा होईल अशा पद्धतीने निर्णय दिला. तसेच, एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर आरोपींविरोधातील आरोप सौम्य करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
या प्रकरणातील न्यायालयीन लढाई आता नव्या टप्प्यावर पोहोचली असून, उच्च न्यायालयात होणारी सुनावणी या खटल्याच्या भवितव्यावर मोठा प्रभाव टाकू शकते. पीडित कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी दाखवलेला निर्धार आणि युक्तिवाद न्यायालयाच्या निर्णयावर परिणाम करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.