मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष
मुंबई, दि. ३१ : दीर्घकाळ रखडलेला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर १७ वर्षांनी जाहीर झाला. २००८ मधील मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात सर्व आरोपींची NIA कडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या सातही आरोपींची पुराव्या अभावी सुटका झाली आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने काश्मीरमधून आरडीएक्स आणले आणि त्याने त्याच्या घरी बॉम्ब तयार केला, याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत. आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर हिच्याकडे त्या मोटारसायकलचा त्यावेळी ताबा होता, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही. तो बॉम्ब त्या मोटारसायकलमध्येच लावलेला होता, असेही निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेले नाही. याशिवाय बॉम्बस्फोट घडवण्यासाठी बैठका झाल्या ते देखील सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले आहे.
२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावात झालेल्या या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०१ जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र ATS ने केला होता. २०११ मध्ये हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात आले. २०१६ मध्ये NIA ने आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत. यापूर्वी निर्णय ८ मे २०२५ रोजी येणार होता, परंतु नंतर तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला होता. अखेर आज हा निकाल जाहीर होत सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
SL/ML/SL