मालाडच्या शंकरवाडी रस्ता रुंदीकरणातील ६४ प्रकल्प बाधितांना चावीवाटप

मुंबई प्रतिनिधी : महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना वेग आला पाहिजे आणि त्यात प्रकल्पबाधितांना घरे दिली जात असताना मोकळ्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
मालाड पश्चिम येथील शंकर लेन (मिसिंग लिंक) रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना पर्यायी पुनर्वसनअंतर्गत पीएपी सदनिका वितरण कार्यक्रम महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयात पार पडला.
५५० मीटर लांबीच्या आणि १८.३० मीटर रुंदीच्या रस्ता रुंदीकरणात प्रकल्पबाधित झालेल्या ६४ कुटुंबांना सोमवारी पीयूष गोयल यांच्याहस्ते चावीवाटप करण्यात आले. या प्रकल्पात एकूण ३५७ बांधकामे हटवण्यात येणार आहेत.
यावेळी पीयूष गोयल म्हणाले, गेल्या वर्षी सामूहिक संकल्प करण्यात आला होता की उत्तर मुंबईतील झोपडीधारकांना शक्यतो त्याच विभागात सुसज्ज घर मिळाले पाहिजे. शंकर लेन येथील प्रकल्प बाधितांना उत्तम दर्जाची घरे मिळाली आहेत.
तीन टप्प्यात होणाऱ्या या रस्त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे तसेच या भागात पाणी तुंबण्याची समस्याही निर्माण होणार नाही, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.
याचवेळी या प्रकल्पाचे तीन टप्प्यात होणारे काम एकामागोमाग न करता एकाचवेळी पूर्ण करण्यात यावे अशी सूचना करून गोयल यांनी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी रस्ते स्वच्छ नाहीत तर काही ठिकाणी सपाटीकरण झाले नसल्याकडे त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
आमदार प्रवीण दरेकर यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याच्या योजनेनुसार उत्तर मुंबईतील रहिवाशांनी त्यादृष्टीने आपल्या इमारतीचा स्वतःच पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात बिल्डर अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही गोयल यांनी दिला. मालवणी परिसरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत यावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. KK/ML/MS