मलबार हिल ‘एलिव्हेटेड नेचर ट्रेल’ला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद
मुंबई, दि. २९ : मलबार हिलमधील ‘एलिव्हेटेड नेचर ट्रेल’ पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत तब्बल १.८१ लाख पर्यटकांनी या हिरव्यागार वाटेवरून चालत पावसाचा आनंद घेतला. मार्च महिन्यात उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे २.९८ लाखांनी येथे भेट दिली असून, पालिकेला या माध्यमातून ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सिंगापूरच्या उंचावरच्या ट्रीटॉप वॉकवरून प्रेरणा घेऊन मलबार हिलवरील लाकडी वॉकवे तयार करण्यात आला आहे. ४८५ मीटर लांबीचा आणि २.४ मीटर रुंदीचा हा ट्रेल कमला नेहरू पार्कजवळून सुरू होतो आणि हिरवळीच्या मध्यभागातून शांततेचा अनुभव देतो. पर्यटकांचा अनुभव सुखद राहावा यासाठी प्रत्येक तासाला फक्त २०० जणांना प्रवेश दिला जातो.
मुंबईकरांसाठी प्रवेश शुल्क २५ रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. या वॉकवेमधून अरबी समुद्राचे मोहक दृश्य दिसते; त्यातच पक्षीनिरीक्षणासाठी स्वतंत्र झोन, काचेतून पाहता येणारा भाग आणि सुंदर व्यूइंग डेकही आहे. पर्यावरणपूरक या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकदा दोन आठवडे आधीच सर्व स्लॉट्स बुक होतात.
हा वॉकवे दररोज पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुला असतो. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च ते ३० सप्टेंबरदरम्यान मलबार हिल नेचर ट्रेलला एकूण २,९१,८३६ पर्यटकांनी भेट दिली आणि त्यातून पालिकेच्या खात्यात ७२,९८,९५० रुपये जमा झाले.
SL/ML/SL