अनाथ , जन्मांध माला हिला एमपीएससी परीक्षेत मिळाले यश

 अनाथ , जन्मांध माला हिला एमपीएससी परीक्षेत मिळाले यश

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी मुलीला जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझ्झर येथील अनाथ आश्रमात या मुलीचा सांभाळ केला त्या माला शंकरबाबा पापळकरने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश मिळविले आहे.

या यशासाठी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मालाचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
येथील गिरीपेठ भागातील अपर आयुक्त कार्यालयात दैनंदिन कामाच्या व्यस्ततेत ठाकरे यांच्या कॅबिनमध्ये मालाचा छोटेखानी गौरव समारंभ पार पडला. यावेळी माध्यम समन्वयक अनिल गडेकर, वझ्झर येथील अनाथ आश्रमातील वार्डन वर्षा काळे, मालाच्या मैत्रिणी ममता,वैषाली,
पद्ममा आणि शिवकुमार पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी या सोहळयाचे प्रत्यक्षदर्शी ठरले.

समाजाने नाकारलेल्या 127 मुलींसोबत माला चा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अंबादासपंत वैद्य बेवारस मतिमंद बालगृहात जीवनप्रवास सुरु झाला. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मालाने शिक्षणाचा प्रवासही सुरु ठेवला. अमरावती येथील प्रतिष्ठीत विदर्भ ज्ञान, विज्ञान महाविद्यालयातून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी पूर्ण केली.

यानंतर 2019 पासून स्पर्धा परीक्षेद्वारे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मालाचा प्रवास सुरु झाला. काल जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होवून माला च्या जिद्दीला यश मिळाले आहे.

माला ही नागपूरमध्ये आल्याचे कळताच ठाकरे यांनी कार्यालयात बोलवून तिला पुष्पगुच्छ देत आणि पेढा भरवून सत्कार केला. तिच्या परिश्रमला मिळालेल्या यशाचे कौतुक करतानाच शासकीय सेवेत येवून मालाने उत्तम कार्य करावे, अशा शुभेच्छाही दिल्या.

या छोटेखानी सत्कार सोहळयाने आनंदी झालेल्या मालाने यशाचे श्रेय शंकरबाबा पापळकर, युनिक अकॅडमी अमरावतीचे प्रा.अमोल पाटील आणि मालाच्या उच्च शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या प्रकाश टोपले यांना दिले आणि शासकीय सेवेत येवून जनसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ML/KA/PGB
13 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *