1 ऑगस्टपासून होणार UPI च्या नियमांमध्ये मोठे बदल
मुंबई, दि. २५ : 1 ऑगस्ट, 2025 पासून UPIच्या नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल GPay, PhonePe, Paytm यांसारखे ॲप्स वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर लागू होतील. हे बदल UPI सेवा अधिक चांगली, सुरळीत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी करण्यात येत आहेत.
- आता तुम्ही एका UPI ॲपवरून एका दिवसात फक्त 50 वेळाच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासू शकाल. वारंवार बॅलन्स चेक केल्याने सर्वरवर अनावश्यक दबाव येतो, तो कमी करण्यासाठी हा नियम आणला आहे.
- तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्यांची यादी तुम्ही एका दिवसात फक्त 25 वेळाच पाहू शकाल. यामुळे अनावश्यक API कॉल्स कमी होतील आणि युपीआय सेवा अधिक सुरळीत चालेल.
- नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड एसआयपी किंवा इतर बिलांचे ऑटोपे व्यवहार आता फक्त कमी गर्दीच्या (नॉन-पीक) वेळेतच पूर्ण होतील. यासाठी सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान, रात्री 9:30 नंतर या तीन वेळा ठरवण्यात आल्या आहेत.
- एखादा व्यवहार अयशस्वी झाल्यास (फेल झाल्यास), तुम्ही दिवसातून फक्त 3 वेळाच त्याचे स्टेटस तपासू शकाल. तसेच, प्रत्येक वेळी स्टेटस तपासण्यासाठी किमान 90 सेकंदांचे अंतर ठेवावे लागेल. यामुळे सर्वरवरील भार कमी होऊन व्यवहारांच्या परतीची (रिव्हर्सल) किंवा पुन्हा प्रयत्न करण्याची (रिट्राई) शक्यता वाढेल.
30 जून 2025 पासून एक महत्त्वाचा बदल आधीच लागू झाला आहे. तो म्हणजे आता तुम्ही कोणाला पैसे पाठवाल, तेव्हा पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला त्या व्यक्तीचे बँकेत नोंदणीकृत नाव दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा किंवा फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
SL/ML/SL