Bank Nomination नियमात मोठे बदल
मुंबई, दि. २४ : केंद्र सरकारने बँकेच्या नॉमिनेशनसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल केले आहेत. हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असून याचा फायदा सगळ्या बँक खातेधारकांना होणार आहे. ज्या ग्राहकांनी बँकेत लॉकर घेतले आहेत, त्यांनाही या बदलांमुळे दिलासा मिळणार आहे. ‘बँकिंग कायदे सुधारणा अधिनियम 2025’ अंतर्गत नामनिर्देशनाचे म्हणजेच नॉमिनेशनचे नियम बदलले आहेत. या नियम बदलांमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
- बँक ग्राहक यापूर्वी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकत होता, बँक नियमांतील बदलांमुळे ग्राहक आता 4 व्यक्तींना नॉमिनी करू शकेल.
- ठेवी धारकही चार नॉमिनी नेमू शकतात. यामध्ये ठेवी धारक प्रत्येक नॉमिनीला किती रक्कम मिळावी याचा वाटा ठरवू शकतो किंवा एकानंतर दुसरा अशा पद्धतीने नॉमिनींचा क्रम ठरवू शकतो
- सिक्युरिटीज आणि सेफ्टी लॉकरसाठीसाठी मात्र नॉमिनी नेमत असताना क्रम ठरवून तसे नॉमिनेशन देता येईल, म्हणजे पहिल्या नॉमिनीचे निधन झाले किंवा त्याने हिस्सा नाकारला, त्यावर पाणी सोडलं तर तो हिस्सा दुसऱ्या क्रमांकाच्या नॉमिनीला जाईल.
- या बदलांमुळे बँक खातेधारक नॉमिनी नेमत असताना प्रत्येक नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा हे देखील ठरवू शकेल. ज्यामुळे ठेवीधारकाच्या मृत्यूनंतर कोणताही वाद उद्भवणार नाही.
- सिक्युरिटीज आणि सेफ्टी लॉकरसाठी नॉमिनी नेमत असताना ग्राहक त्याच्या पसंतीनुसार नॉमिनींची नावे ठरवू शकतो, त्यामुळे ती रक्कम, लाभ कोणाला मिळावा हे आधीच निश्चित करणे सोपे जाईल.
यापूर्वी बँक खातेदार त्यांच्या ठेवी आणि लॉकरसाठी फक्त एकाच व्यक्तीला वारसदार (नॉमिनी) ठेवू शकत होते. ज्या व्यक्तीला नॉमिनेशन दिलं आहे त्या व्यक्तीचे निधन झाल्यास बऱ्याच कटकटी निर्माण होत होत्या. अनेकदा या मुद्दावरून कुटुंबामध्ये वादही निर्माण होत होते. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सरकारने नॉमिनेशनची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून बँक खातेधारक एकाऐवजी चार नॉमिनी नेमू शकतील. बँकेमध्ये लॉकर असेल तर त्यासाठीही ग्राहक 1 नोव्हेंबरपासून 4 नॉमिनी नेमू शकतील. बँक ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार वारसदार निवडता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर पैसे त्याच्या वारसांना मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद करणे, सोपी आणि पारदर्शक व्हावी हा या बदलांमागचा मूळ उद्देश आहे.
SL/ML/SL