स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याचा अभाव : प्रा. मिलिंद जोशी

पुणे, दि २१: स्त्री-पुरुष मैत्रभावाचा संबंध कायम लैंगिकतेशीच निगडीत असतो असे नाही. स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याची निकोप मानसिकता प्रगत समाजातही अभावानेच दिसते. आपल्या जवळची माणसे आपल्याला न उमजणे ही जीवनाची शोकांतिका आहे. अमृता प्रीतम व इमरोज यांच्यातील नात्याने रक्ताच्या नात्यापलिकडच्या सर्जनासाठीच्या प्रेरणांना जन्म दिला. संजीवक शक्ती बनून जगण्याच्या लढाईतली उमेद वाढवली, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
‘शी लिव्हज् ऑन’ या डॉ. उमा त्रिलोक लिखित पुस्तकाचा ‘ती आहेच..’ या अमृता प्रीतमच्या नंतरचे इमरोज या मराठीत अनुवादीत डॉ. वृषाली किन्हाळकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. २० ऑगस्ट) प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रा. जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. नवी पेठेतील प्रभु ज्ञानमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुबंध प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी व्यासपीठावर होत्या.
प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, रक्ताचे नाते असो वा मैत्रीचे ते विश्वास आणि निरपेक्ष प्रेमामुळेच बळकट होते. देखण्या घराचे कोरीव दरवाजे बंद झाले की, आत रडण्या-कुढण्याचेच आवाज येतात. हरवलेला संवाद, दुभंगलेली मने आणि विस्कटलेली नाती हेच त्यामागचे कारण असते. पैसा सर्वस्व झालेल्या आजच्या समाजात नात्यातली गुंतवणूक दुय्यम ठरते आहे. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नात्यातली गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्यातील नात्याने कधी बौद्धिक सहजीवनाची भूक भागविली तर कधी आयुष्यातले रितेपण भरून काढले. त्यातूनच कधी जगण्याला नवा अर्थ दिला. या दोन प्रतिभावंतांनी एकमेकांमध्ये संघर्ष निर्माण न करता एकमेकांना अवकाश देत आपापले अस्तित्व सांभाळले. या दोघांचे सहजीवन हा निखळ प्रेमाचा आदर्श वस्तुपाठच आहे.
रविमुकुल म्हणाले, अमृता प्रीतम यांच्या साहित्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘ती आहेच..’ या पुस्तकाचा उपयोग होईल. या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष संबंधांचे वेगळेपण समाजासमोर येत आहे.
लेखन प्रवासाविषयी बोलताना डॉ. वृषाली किन्हाळकर म्हणाल्या, अमृता प्रीतम यांची तहहयात पूजा करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे इमरोज होय. अमृत प्रीतम यांना न मिळालेले प्रेम इमरोज यांनी भरभरून दिले. यात त्यांनी कधीच मोठेपणा घेतला नाही. कठोर समाजटीकेला झेलत तब्बल ४५ वर्षे त्यांनी निरपेक्ष आणि निस्वार्थी वृत्तीने अमृता प्रीतम यांच्यावर प्रेम केले. अमृता प्रीतम यांच्या मृत्यूनंतरही त्या आहेतच या ठाम भावनेने ते जगत राहिले. अशा दुर्लभ व्यक्तीमत्त्वाची अनेकदा भेट झाल्याने त्यांच्यातील प्रेमाची महती मला भावली आणि त्यातूनच डॉ. उमा त्रिलोक लिखित पुस्तकाचा अनुवाद केला. नव्या पिढीला प्रेमाचा अर्थ कळावा, अस्थिर समाजकाळात टोकाच्या भूमिका घेणाऱ्या मुलांना प्रेमाची खोली कळावी, मुले प्रगल्भ व्हावीत तसेच सहजीवनाचा आदर्श समाजासमोर यावा या करिता हे पुस्तक लिहिले आहे.
सुरुवातीस अस्मिता कुलकर्णी यांनी गुणवंत साहित्यिकांना प्रकाशवाटेवर आणण्याचे काम अनुबंध प्रकाशन करीत आहे, असे सांगून प्रकाशन संस्थेची वाटचाल उलगडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मेघना यंदे-गुमटे यांनी केले.KK/ML/MS