ससूनमधील मावशी, दायी, सफाई कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा पुरस्काराने गौरव

पुणे प्रतिनिधी: सिटी ग्रुप ॲमानोरा येस्स फौंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रुग्णालयातील सहा मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांचा मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्काराने तर ससून, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ससून रुग्णालयातील महात्मा गांधी सभागृहात बुधवारी (दि. 15) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मल्लपा जाधव, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. किणीकर, सीईओ मगर, प्रशासकीय अधिकारी डॉ. आवटे, मेट्रन विमल केदार, सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
सिटी ग्रुपचे चिफ सोशल ऑफिसर विवेक कुलकर्णी यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, सिटी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे यांच्या मातोश्री मीरा देशपांडे यांचे ससून रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातच शिक्षण झाले होते तर वडिल डॉ. प्रद्युम्न देशपांडे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मीरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालयातील मावशी, दायी, सफाई महिला कर्मचाऱ्यांना मीरा देशपांडे स्मृती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच परिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सामाजिक बांधिलकी, सेवा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो.
चांदणी अमित चव्हाण, कलावती सोपान कांबळे, पूनम प्रमोद सुसगोहेर, त्रिवेणी गौतम सोनवणे, संगीता सनी सोलंकी, हेमा गालफाडे या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, साडी, स्मृतीचिन्ह, अकरा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. तर सना खान, इन्सिया सय्यद, साक्षी तिरमाने, क्षितीजा मोरे या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र, पंधार हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव आणि शिष्यवृत्ती वाटप रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या हस्ते झाले.