तृमणूलच्या महुआ मोइत्रा यांची खासदाकी रद्द

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी सरकारच्या विरोधात संसदेत आणि संसदेच्या बाहेर देखील टीकेच्या तोफा डागणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
संसदेच्या एथिक्स कमिटीनं महुआ मोइत्रा यांची चौकशी करून आज दुपारी १२ वाजता या संदर्भातील अहवाल दिला होता. या अहवालावर चर्चा सुरू होताच मोठा गदारोळ झाला. त्यामुळं कामकाज स्थगित करण्यात आलं. दुपारी पुन्हा २ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी महुआ यांच्या हकालपट्टीचा ठराव मांडला व तो बहुमतानं मंजूर करण्यात आला.
या ठरावावर बोलण्याची संधी देखील मोइत्रा यांना मिळाली नाही. लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा संतापल्या. त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्याचा कोणताही पुराव माझ्याविरुद्ध नाही, हे स्पष्ट झालं होतं. माझ्याविरुद्ध योग्य तपास झाला नाही. आरोप करणाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्याची तसदीही कुणी घेतली नाही. त्या बिझनेसमनला समितीनं चौकशीसाठी का बोलावलं नाही?, असा सवाल त्यांनी केला.
SL/KA/SL
8 Dec. 2023