Mahindra ची Thar आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिमाखदार लुकमुळे महिंद्रा कंपनीची ‘थार’ गाडी ही भरपूर लोकप्रिय झाली आहे. या गाडीचं आता इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका इव्हेंटमध्ये 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनी या कारचं डिझाईन सादर करणार आहे. या थारचं डिझाईन कसं असेल, किंमत किती असेल, किंवा ती कधी लाँच होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 15 ऑगस्ट रोजी यातील फीचर्ससोबत ही माहिती देखील उपलब्ध होईल. थार गाडी ही ऑफरोडिंग वैशिष्ट्यासाठी ओळखली जाते. इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये त्याचं हे वैशिष्ट्य कायम ठेवण्यात येणार आहे. सोबतच यामध्ये क्वाड-मोटर सिस्टिम देण्याची शक्यता आहे. क्रॅब स्टिअर किंवा क्रॅब-वॉक सारखे फीचर्स देखील यामध्ये असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
क्रॅब-वॉक फीचर असणाऱ्या गाड्यांची चारही चाकं जागेलाच 45 अंश कोनापर्यंत वळू शकतात. या फीचरमुळे अशा गाड्या उभ्या जागी 360 अंश कोनात वळू शकतात. तसंच, अशा गाड्या आडव्या देखील चालू शकतात. यामुळे अतिशय छोट्या जागी पार्किंग करणं किंवा गाडी वळवणं सोपं होतं. हमर ईव्ही आणि G-क्लास प्रोटोटाईप कार्समध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. (Electric Vehicles)
सध्या थार गाडी ही विविध प्रकारच्या इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. 4×4 व्हेरियंटमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर, 4×2 व्हेरियंट हे 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
SL/KA/SL
1 Aug 2023