न्यू माहीम महानगरपालिका शाळा महानगरपालिकेमार्फतच पुनर्बांधणी केली जाणार
मुंबई, दि १०
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या न्यू माहीम शाळेबाबत दिशाभूल करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे.यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत C1 श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली. असे असले तरी पालक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे त्रयस्थ सल्लागार संस्थांमार्फतदेखील संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले. या संरचनात्मक लेखापरीक्षणातदेखील ही इमारत ‘अतिधोकादायक’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने (T.A.C.) देखील ही शालेय इमारत अतिधाेकादायक असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा विविध भाषिक आहे. केवळ मराठी माध्यमाची नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने या शालेय इमारतीतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत नियोजनबद्ध स्थलांतरण करण्यात आले आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांचे पर्यायी व्यवस्थेत स्थलांतरण करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असे म्हणणे योग्य ठरत नाही.
ज्या ठिकाणी न्यू माहीम शाळेची इमारत आहे, त्याच ठिकाणी इमारतीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीची बांधणीदेखील महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही, हेदेखील प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
माहीम मोरी शालेय इमारत पुनर्बांधणीची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. त्याची निविदा प्रकाशित झाली आहे. नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश (Work Order) देण्यात येतील.KK/ML/MS