महिला अत्याचार गुन्ह्यात दोषसिद्धी प्रमाण अत्यल्पच

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशभरात महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण केवळ ३६.६ टक्के आहे. हेच प्रमाण महाराष्ट्रात ३४.३ टक्के आहे. शासकीय संकेतस्थळावरून ही माहिती समोर आली आहे.
महिलाविषयक गुन्हे संवेदनशील असल्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडूनच तपास करण्यात येतो. परंतु, पोलीस विभागात महिला पोलीस अधिकाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास संथगतीने सुरू असतो. पोलीस गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटकही करतात. मात्र, न्यायालयात आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यात अनेक अडचणी येतात. कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा आरोपींच्या वकिलांकडून घेतला जातो. सबळ पुरावे पोलिसांना गोळा करता आले नाही किंवा साक्षीदारांनी साक्ष फिरवली तर त्याचाही फायदा आरोपींना होतो. अनेकदा तांत्रिक पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. अनेकदा न्यायालयीन किचकट प्रक्रिया लक्षात घेता पीडित महिला स्वत:च तक्रार मागे घेतात. ठराविक वेळेपूर्वी आरोपपत्र दाखल करण्यासाठी घाईघाईत तपास पूर्ण केला तर त्या सदोष तपासाचाही लाभ आरोपीला मिळतो.
ML/ML/PGB 15 Nov 2024