स्वयंपुनर्विकास योजना महाराष्ट्रातील*
गृहनिर्माण सेक्टरमध्ये ‘गेमचेंजर’ होईल*

आमदार प्रविण दरेकर
मुंबई प्रतिनिधी- मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वयपुनर्विकास प्रकल्पांना ताकद मिळेल, असा अहवाल सरकारला सादर करू, त्यातून स्वयंपुनर्विकास योजना महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया स्वयंपूनर्विकासातील अडचणी सोडविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अभ्यासगटाच्या बैठकीनंतर अभ्यासगटाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. आज सहकारी गृहनिर्माण स्वयंपूनर्विकास अभ्यासगटाची पहिली बैठक गृहनिर्माण भवन, वांद्रे येथे संपन्न झाली.
स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रकल्पांना सवलती देणारा शासन निर्णय शासनाने १३ सप्टेंबर, २०१९ ला काढला होता. या शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विस्तृत चर्चा बैठकीत झाली. सर्व संबंधित विभागांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, याची माहिती मागवली जाणार आहे, अशी माहिती दरेकर यांनी दिली. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करताहेत. मुंबईत ज्या १५ इमारती स्वयंपुनर्विकसित झाल्या, मुंबईतून जो मराठी माणूस बाहेर जात होता त्याला मुंबईत राहण्यासाठी स्वयंपुनर्विकास हे हत्यार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ओळखले. म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली या विषयात आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पैसे उभे करण्याबाबत काय केले पाहिजे, नियमात काही सुधारणा केल्या पाहिजेत का? अशा प्रकारचा सर्वकष अहवाल शासनाला अभ्यास गटाच्या माध्यमातून द्यावा, अशी सरकार व मुख्यमंत्री यांची इच्छा आहे. त्यामुळे आज जवळपास अडीच तास सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या हौसिंग विषयावर बैठकीत उहापोह झाल्याचे दरेकरांनी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले कि, या चर्चेत सरकारने १८ निर्णय केले होते. त्यातील बऱ्याच निर्णयांची अंमलबजावणी झाली नव्हती. ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून काय केले पाहिजे, त्या-त्या विभागाने जीआर काढले पाहिजेत या संदर्भात संदीग्धता होती ती दूर करण्याचे ठरले. तसेच हा विषय केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या सर्व महापालिका क्षेत्रात, तालुका स्तरावरील नगरपालिका, पंचायत क्षेत्रात कसा राबविता येईल याची अहवालात मुख्यमंत्र्यांना अपेक्षा आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व महापालिका आहेत तेथील जिल्ह्याचे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्षही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. ते हा विषय त्यांच्या क्षेत्रात नेणार आहेत. काही आमदारांवरही ही जबाबदारी देण्यात आली आहे. ते तेथील यंत्रणेसोबत चर्चा करतील. त्यांचेही काही प्रश्न असतील तर ते आम्ही अहवालात समाविष्ट करू व चांगला परिपूर्ण अहवाल स्वयंपुनर्विकासासंदर्भात कसा होईल याची काळजी घेऊ, असेही दरेकरांनी स्पष्ट केले.