सेवाव्रती सारथी – महेश सामंत

 सेवाव्रती सारथी – महेश सामंत

मुंबई दि १३ : आपल्या रोजच्या धावपळीत आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. अनेक चेहरे ओळखीचे होतात. प्रसंगपरत्वे काहीजण लक्षात राहतात, तर काही मोजकेच अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपल्या स्वतःच्या शांत, सालस, निर्गवी स्वभावाने आचार-विचाराने आपल्या मनात प्रेमाचे आदराचे स्थान मिळवितात. याच पाऊलवाटेवरचा कार्यकर्ता पदयात्री व्यक्तीमत्व म्हणजे महेश मोहन सामंत. आमदार कालांतराने म्हाडा अध्यक्ष, नंतर राज्यमंत्री त्यानंतर कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री झालेले राज्याचे विद्यमान मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सहाय्यक मदतनीस.

राजकारणाच्या विश्वातला प्रचलित शब्द पी. ए., पण महेशची समाजातील ओळख ही त्याच्या स्वभावामुळे, कार्यशैलीमुळे प्रत्येकाला मदत करण्याच्या वृत्तीमुळे, वेगळी आहे. खरेतरं लोकप्रतिनिधी, पुढारी, मंत्री यांचा पी.ए. हा उजवा हात असतो. या उजव्या घटकाबद्दल नेहमी “चहापेक्षा किटली गरम” असा सर्वसाधारण अनुभव असतो. पण मीना आणि मोहन सामंत दाम्पत्यांचा हा सुपुत्र या प्रचलित समजाला अपवाद आहे. या दाम्पत्यांच्या संसारवेलीवर १३ नोव्हेंबर १९७६ ला महेशचा जन्म झाला. आज त्याचा वाढदिवस. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवसाचा आनंद वेगळा असतो.

आज त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचे अभिष्टचिंतन करताना, मागे वळून पाहताना आठवते ती महेशची अपार मेहनत, अविरत कष्ट, जीवाचे रान करुन मा. उदय सामंत यांचे पी. ए. म्हणून काम करताना हजारो लोकांची गतीने कामे मार्गी लावणारा एक धडपड्या मदतनीस. त्याची आई मीना सामंत – माहेरची पूर्वाश्रमीची मंगल कुरुप मत्स्य विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणला नोकरी करत होती. वडील मोहन सामंत राज्य
शासनाच्याच रोजगार विभागात कार्यरत होते. महेश एकुलता एक मुलगा.

त्याचे पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मालवणच्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. महेश आठवीत असताना सामंत कुटुंबाच्या आनंदी संसाराला नियतीची दृष्ट लागली. त्याच्या वडिलांचे निधन झाले. आठवीतल्या महेशचे पितृछत्र हरपलं. खंबीर आईने निर्णय घेतला मालवण सोडायचं. दोघेही रत्नागिरीत आले. इथेच राहायचं ठरलं. त्या माऊलीचे ध्येय होतं एकुलत्या एक मुलाला – महेशला मोठं करायचं. रत्नागिरीतल्या शिर्के हायस्कूलमध्ये लाजराबुजरा, मितभाषी महेश दहावीपर्यंत शिकला. पुढे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बारावीत दाखल झाला. इथल्या महाविद्यालयीन दिवसातच त्याची भेट झाली ती विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्या सोबत. मंत्री सामंत त्यावेळी गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये महेशच्या पुढे एक वर्षे शिकत होते. विद्यार्थीदशेत दोघांची ओळख, परिचय आणि पुढे मैत्री झाली. मैत्रीचे ऋणानुबंध इथेच घट्ट झाले.

आपण भलं की आपला अभ्यास भला असा विचार करणारा, फारसा मित्रपरिवारात, घोळक्यात न दिसणा-या महेशच्या व्यक्तीगत आयुष्याला विधायक कलाटणी मिळाली ती गोगटे जोगळेकर कॉलेजमधल्या त्या मैत्रीनं. अतुट मैत्री आणि दोघांच्या सामंत आडनाव साधर्म्याचे प्रेम यामुळे पुढे महेश पालीतल्या सामंत कुटुंबियांचा घरातला माणूस झाला. उद्योजक रविंद्र उर्फ आण्णा सामंत यांच्या आर.डी. सामंत उद्योग समूहात त्याने सुरुवातीच्या दिवसात नोकरी केली. इकडे त्याचवेळी राज्याच्या राजकारणात (सन १९९५ ते २०००) या कालावधीत तरुण उदय सामंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यावेळच्या सामाजिक कार्यकर्ता उदय सामंत सोबत मदतनीस / सहाय्यक म्हणून महेशची सुरुवात इथूनच झाली. सन २००४ साली राज्यातल्या विधानसभेच्या रणधुमाळीत गणेशोत्सवाच्या धामधुमीत आमदारकीच्या तिकिटाने पालीतल्या सामंत कुटुंबियांच्या घरात निवडणूक विजयाच्या रुपाने पहिलेवहिले आमदार पद आले. तरुण कार्यकर्ता उदय रविंद्र सामंत याची आमदार उदय रविंद्र सामंत म्हणून कारकीर्द सुरु झाली.

उदयची ती पहिलीच निवडणूक आणि इथूनच खऱ्या अर्थाने आमदारांचा पी. ए. ही महेशची समाजातली, रत्नागिरी जिल्ह्यातली, कोकणातली ओळख सुरु झाली. आमदार कार्यक्षेत्रातल्या विधानभवन, मंत्रालय, राज्यशासनाची विविध खाती यंत्रणा, इथला पत्र व्यवहार संपर्क, नित्याच्या बैठका, लोकोपयोगी कामांचा पाठपुरावा, आमदार मतदार संघातील विविध शासकीय योजना प्रकल्प या सर्वच गोष्टी आमदारांचा पी.ए. म्हणून महेशला नवख्या होत्या. पण जे समजत नाही ते समजून घ्यायचं आणि जे उमजत नाही ते शिकायचं ही जन्मदात्या आईची – मीना सामंतांची शिकवण, संस्कार लाभलेल्या या मुलाने ती सर्व जबाबदारी लिलया पेलली.

विधानभवन आणि मंत्रालयाच्या आवारात आमदार पी. ए. जगतात महेशचे नाव अग्रक्रमाने येवू लागलं. रत्नागिरीच्या जयस्तंभ परिसरात आमदार उदय सामंत संपर्क कार्यालय सुरु झाले. इथे कामासाठी येणारा प्रत्येकजण प्रसंगी आमदार साहेब दौऱ्यावर असल्यामुळे विश्वासाने महेशला भेटतात, आपले काम सांगतात. त्याच्या कार्यकुशलतेने, मदत करण्याच्या वृत्तीने लोकांची कामे मार्गी लागू लागली. वेळकाळेचे भान न ठेवता त्याने प्रत्येक कामात लक्ष घातले. पुढे काळाच्या ओघात सन २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या उदय सामंतांच्या चारही विधानसभा निवडणूक प्रचार प्रसार कामात महेश अनुभव संपन्न झाला. प्रथम आमदार ते आज राज्याचा उद्योगमंत्री या उदय सामंतांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीत विश्वासू, एकनिष्ठ, पी.ए. महेश सामंत हा त्यांचा मोलाचा आधार आहे.

आपल्या साहेबाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना महेश सहज बोलून जातो – साहेबांनी एकदा माझ्यावर एखादं काम सोपावलं की ते पूर्ण विश्वासाने काम सोपवतात, समोरच्यावर विश्वास ठेवून त्याला पूर्णपणे ते काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देवून काम करुन घ्यायच या त्यांच्या काम करण्याच्या या कार्यशैलीमुळे मला प्रत्येक काम करताना साहेबांपेक्षा कामाच्या यशस्वीतेचं दडपण राहतं, पण त्यांनी माझ्यावर टाकलेला आणि दाखविलेला विश्वास हेच माझ्या कामाच बळं असतं. याच पाठबळामुळे मी त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम करतो, कधी चूक झाली तर साहेब ओरडत नाही, रागावत नाहीत. आपल्या साहेबाप्रती असणारी कृतार्थता, प्रेम, आदर ही त्याच्या व्यक्तीगत जीवनातील वैभवसंपन्न संपत्ती आहे तेच त्याचे ऐश्वर्य आहे.

रत्नागिरी पंचक्रोशीतील प्रत्येक माणसाला हॉस्पिटलमधल्या औषधोपचारापासून ते नोकरी रोजगार मिळवून देण्यापर्यंत, कौटुंबिक अडचणीपासून नोकरीतल्या बदलीपर्यंत, मुलांच्या अॅडमिशनपासून शासकीय कार्यालयात अडलेल्या कामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर रत्नागिरीतल्या जयस्तंभावरच्या आमदार संपर्क कार्यालयात महेशचा प्रामाणिक कार्य पाठपुरावा चालू असतो. साहेबांच्या पश्चात त्यांच्या अनुपस्थितीत ठरवेली कामे मार्गी लागतात ही त्याची ओळख आज समाज मनात रुजली आहे. दस्तुरखुद्द उदय सामंतांना परिपूर्ण खात्री असते की एकदा महेशला एखाद्या कामाची जबाबदारी दिली की ते काम यशाने पूर्णत्वाला जाते.

सन २००० च्या दरम्यान पु. ल. देशपांडे करंडक एकांकिका स्पर्धांचे त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंतांच्या जिल्हा युवा अध्यक्ष पद मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा संपन्न झाली होती. त्यावेळी त्या स्पर्धेच्या संयोजनातील महेशचा सहभाग त्याच्या पुढच्या वाटचालीला दिशा दाखविणारा ठरला. कुठल्याही कार्यक्रमाचं, उपक्रमाचं, स्पर्धेचं संयोजन असे कराव की त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत / मुख्य समारंभात आपण शांतपणे सभागृहात बसलेले असावं, त्या प्रसंगाचा आनंद घ्यावा, इतके नीटनेटके संयोजन आपण करायला हवं हा धडा त्यावेळचे स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून मला मिळाला हे महेश आजही आवर्जून अभिमानाने सांगतो.

गोगटे कॉलेजमध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो कोल्हापूरला शिवाजी विद्यापिठात दाखल झाला. तिथे त्याने बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स ला प्रवेश घेतला. विद्यापिठाच्या भव्य ग्रंथालयातील त्या पुस्तकांच्या दालनात, पुस्तकांच्या सहवासात एखाद्या विद्यार्थ्याला हवे असणारे नेमकं पुस्तकं जलद गतीने शोधून देणे, पुस्तकांना, ग्रंथांना अलवारपणे हाताळणे यातूनच माणसांना हाताळण्याचं आपल्याला शिक्षण मिळाल. कामाचं व्यवस्थापन आणि उपक्रमाचं नियोजन या सर्वांच बाळकडू कोल्हापूरातल्या त्या मंतरलेल्या दिवसात मला मिळालं अशी आठवण तो आजही सांगतो. घरच्या परिस्थितीमुळे तिथे शिकताना कमवा आणि शिका या सूत्राने महेशने तिथल्या मेसमध्ये विद्यार्थ्यांना जेवणाच्यावेळी जेवण वाढप्याचं कामही केलं. जिद्द एकच होती भविष्यात आपल्याला चांगलं काही करायचं आहे.

स्वतःबद्दल तो इतकच बोलतो तसा मी खूप बोलका किंवा खूप अॅक्टीव्ह असा नव्हतो पण कोल्हापूरातल्या त्या शैक्षणिक दिवसात माझा विद्यार्थ्यांबरोबर समकालीन मित्रांबरोबर संपर्क आला, जनसंपर्क वाढला. नेमकं कोणाला काय हवं काय नको हे कळू लागलं. थोडक्यात जीवन व्यवस्थापनाचे मूलभूत शिक्षण हे मला कोल्हापूरातल्या त्या मंतरलेल्या दिवसांनी दिले अस तो आनंदाने सांगतो.

आपण मंत्र्यांचा पी.ए. असलो तरी सेवामदतनीस आहोत याचे त्याला भान आहे. त्याच्या वाचन आवड छंदामुळे त्याला राज्याच्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक विश्वाचे उत्तम ज्ञान आहे. माझ्या माहीतीप्रमाणे त्याची जनमानसातील लोकप्रियता अतिशय उत्तम आहे. ऊतू नये मातू नये ही त्याच्या आईची शिकवण ही त्याची जीवनशैली आहे. सतत कामाच्या फेऱ्यात गुरफटेला हा अवलिया पारंपारिक भक्ती संप्रदायाचा विनम्र साधक आहे. दर गुरुवारी कितीही घाईगडबड असली तरी रत्नागिरीतीलल्या घुडेवठार दत्तमंदीरातील त्याची दर्शन भेट चुकत नाही.

माणसांच्या जगात माणूसकी जपणारा हा सेवाव्रती पी.ए., महेश सामंत सारखा सहाय्यक मदतनीस, राज्याच्या, देशाच्या कानाकोपरातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला लाभायला हवा. माझ्या दूरदर्शन नोकरी सेवेमुळे मला उभ्या महाराष्ट्रात फिरण्याची संधी मिळाली. समाजाच्या विविध स्तरावरील लोकजीवन, लोकसंस्कृती मी पाहिली. अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी त्यांच्या पी. ए. ना जवळून पाहता आले. त्यातल्या अपवादाच्या राजपथावरील मंत्री उदय सामंतांच्या कार्यकर्तुत्व रथाचा महेश हा सेवाव्रती सारथी आहे. त्याच्या सांसारिक वाटचालीत पत्नी श्रद्धाची त्याला उत्तम साथ आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी महेशला एका कठीण आजारपणामुळे त्याला एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. शक्य असूनही अत्यंत शांतपणे, धिरोदात्तपणे ही कठीण आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मुंबई सारख्या शहरात न जाता त्याने रत्नागिरीत करुन घेतली.

मला त्याचा भावलेला गुण म्हणजे त्याचा साधेपणा. मस्ती आणि माज यापासून चार हात दूर असणा-या महेशला मी २००४ पासून जवळून पाहतो आहे. असा आदर्श पी.ए. राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला लाभावा ही अपेक्षा त्याच्या वाढदिवशी या लेखन प्रपंचात व्यक्त करणे संयुक्तिक ठरेल. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून त्याच्या संकल्पनेतून उदय सामंत प्रतिष्ठान विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात होत आहेत. दिवाळीतल्या रांगोळी प्रदर्शनापासून चरित्रकार धनंजय कीरांच्या चरित्र प्रदर्शनापर्यंत विविध कार्यक्रमाच्या आयोजनात पडद्यामागे महेशचा हात आहे.

आज त्याचा ४९ वा वाढदिवस. राज्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कार्यकर्तुत्वाने लोकप्रिय ठरलेल्या मराठी भाषा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत त्यांचा पी.ए. म्हणून त्यांची सावली बनून काम करणाऱ्या माझ्या या स्नेही मित्राला सेवाव्रती सारथी महेश सामंतला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!! प्रिय महेश तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरामय आरोग्य स्वास्थ्यासाठी माझ्या हार्दिक स्नेह शुभेच्छा !!!

जयू भाटकर
निवृत्त सहा. संचालक
मुंबई दूरदर्शन

ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *