महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार
ठाणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “मराठीतील सुपरस्टार” महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याची घोषणा आज ठाण्यात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना जाहीर झालेला गंधार गौरव पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२३ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी शनिवारी गडकरी रंगायतन येथे दिली.
यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्यावर्षी सचिन पिळगाकर यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते “महेश कोठारे” यांना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते कोठारे याना पुरस्कार देण्यात येणार आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते.
या स्पर्धेसाठी राजेश भोसले आणि हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी उपस्थित होते.
, ML/KA/PGB 28 Oct 2023