महाविकास आघाडीत २७० जागांवर सहमती , उद्या पुन्हा चर्चा
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला असे आज सायंकाळी जाहीर करण्यात आले असून त्यानुसार २७० जागांवर सहमती झाली आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले मात्र अद्यापही काही जागांवर तिढा सुटलेला नाही त्यावर उद्या पुन्हा चर्चा होणार आहे.
महविकास आघाडीत आज दिवसभर खलबतं सुरु होती आणि शेवटी २७० जागांवर सहमती झाल्याचे सायंकाळी जाहीर करण्यात आले. उर्वरित जागांवर तसेच मित्र पक्षांना द्यायच्या जागांसाठी उद्यापासून पुन्हा चर्चा सुरु करणार असल्याचेही आज सांगण्यात आले.
वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याशी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची सायंकाळी चर्चा झाली, त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घातलेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. प्रत्येकी ८५ जागांवर तिन्ही पक्षात अद्यापि सहमती झाल्याचे यावेळी सांगण्यात आले, मात्र महाविकास आघाडीत एकूण १८ जागांचा तिढा अद्याप कायम आहे. सध्या तिन्ही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांचं वाटप झाल्याचं संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येकी ८५ जागांचे वाटप झाल्याचे राऊत जरी सांगत असले तरी आज शिवसेना उबाठा पक्षानं आपल्या ६५ उमेदवारांचीच यादी आज जाहीर केली तसेच तिन्ही पक्षात प्रत्येकी ८५ जागा वाटल्या आणि एकूण सहमती २७० जागांची जाहीर केली त्यामुळे मधल्या पंधरा जागा कोणाला हे यात स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अखेर कधी संपणार हे आता पाहावं लागेल.
ML/ML/PGB 23 Oct 2024