महाविकास आघाडीत झाली बिघाडी …
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नव्या विधानसभेच्या पहिल्याच दिवशी शक्ती क्षीण झालेल्या महाविकास आघाडीच्या समन्वयामध्ये मोठा अभाव दिसला असून काँग्रेसने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या इतर पक्षांपर्यंत पोहोचलाच नसल्याने विधानसभेच्या सभागृहात काहींचा बहिष्कार तर काही सदस्य सभागृहात हजर असे चित्र निर्माण झाले होते.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागल्यामुळे त्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या आघाडीतील बहुतांश नेत्यांनी ईव्हीएम यंत्राला दोष देण्यास सुरुवात केली होती, ती अद्याप कायम आहे हे मतदान आम्हाला मान्यच नाही, हा निकाल आम्हाला मान्यच नाही, जनतेच्या मनात हा निकाल नव्हताच असा पवित्रा घेत विरोधकांनी नवीन सरकार वरती टीकेची तोफ डागली आहे .
याचाच एक भाग म्हणून आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनावर पहिल्याच दिवशी काँग्रेसने बहिष्कार घातला. अयोग्य प्रकारे मतदान करून जिंकून येणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज शपथविधीला गेलो नाही असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांसमोर केला. मात्र त्यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांना माहितीच नव्हता. त्यामुळे विधानसभा सभागृहात शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उपस्थित असल्याचे दिसून आले.
एकीकडे काँग्रेसचा बहिष्कार तर दुसरीकडे आघाडीतल्या इतर पक्षांचा सभागृहातला सहभाग यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसून आले. तिसरीकडे याच आघाडीचे घटक असणाऱ्या समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या दोन्ही पक्षांचे सदस्य सभागृह सभागृहात हजर राहिले आणि त्यांनी सदस्यतेची शपथही घेतली यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललय काय या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पराभवाच्या धक्क्यातून सावरायला आघाडीला अद्याप वेळ लागेल अशी बोलकी प्रतिक्रिया आघाडीतल्याच एका आमदाराने दिली आहे.
ML/ML/PGB 7 Dec 2024