महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता , उमेदवारांची कुरघोडी
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन प्रमुख आघाड्यांमधील घटक पक्षांनी आज आपले आणखी उमेदवार जाहीर केल्यानंतर आतापर्यंत महायुतीचे २११ उमेदवार तर महाविकास आघाडीचे २१३ उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र महा विकास आघाडीत परांडा मतदारसंघात बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
परांडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली तर शिवसेना उबाठा पक्षाने रणजित पाटील यांना तिथेच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपणच अर्ज भरणार असून कोणत्याही स्थितीत माघार नाही अशी भूमिका घेतली आहे. या जागेवर आमची चर्चा सुरू आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आज बाळासाहेब थोरात यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन काही जागांवर अदलाबदल होऊ शकते का ते तपासून पहात आहोत असे प्रसार माध्यमांना सांगितले. धुळ्यातील जागेवर शिवसेना ऊबाठा पक्षाने अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केली त्याला समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला असून ही जागा आम्हालाच हवी अशी भूमिका घेतली आहे.
आज भाजपाने आपल्या आणखी बावीस उमेदवारांची यादी जाहीर केली, काँग्रेस ने तेवीस उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपल्या बावीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित उमेदवार जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.
ML/ML/PGB 26 Aug 2024